अमरावती - पहाटे साडेपाच वाजता दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना फाशी झाल्याने सर्व स्तरांमधून त्याचे स्वागत होत आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा कौर यांनी संबंधित प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. आजचा दिवस हा देशातील महिलांसाठी गर्वाचा असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो, असे म्हणून त्यांनी निर्भयाप्रमाणे इतर बलात्काराच्या पीडितांना देखील न्याय मिळण्यासाठी जलदगती न्यायालयात हे खटले चालवण्याची मागणी केली आहे.
#Nirbhaya Case : 'आजचा दिवस देशातील महिलांसाठी गर्वाचा' - navneet rana in amravati
पहाटे साडेपाच वाजता दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना फाशी झाल्याने सर्व स्तरांमधून त्याचे स्वागत होत आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा कौर यांनी संबंधित प्रकरणावर प्रतिक्रिया दिलीय.
सात वर्षांपूर्वी 16 डिसेंबर 2012 ला दिल्लीत एका बसमध्ये 22 वर्षाच्या युवतीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. यानंतर तिची अमानुषपणे हत्या देखील करण्यात आली. या घटनेने संपूर्ण देश हादरला. मागील सात वर्षे हा खटला चालू होता. यानंतर आरोपींना फासावर लटकवण्याची मागणी सर्व स्तरांतून होत होती. अखेर आज पहाटे मुकेश, पवन गुप्ता, विनय कुमार शर्मा आणि अक्षय ठाकूर या चारही नराधमांना तिहार कारागृहात फासावर लटकवण्यात आले.
यानंतर खासदार नवनीत राणा यांनी भावना व्यक्त करताना भारताची महिला म्हणून गर्व होत असल्याचे माध्यमांना सांगितले. यासाठी न्याय व्यवस्थेचे त्यांनी आभार मानले. तसेच या प्रकारच्या अन्य प्रकरणातही जलदगतीने खटले चालवून न्याय देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. देशातील सर्व महिला आजच्या दिवसाची वाट पाहत होत्या, असे त्या यावेळी म्हणाल्या.