शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात अमरावतीची 'चित्रांगदा' अमरावती Natya Sammelan 2023 :अमरावतीचे नाट्यकर्मी विशाल तराळ लिखित आणि दिग्दर्शित 'चित्रांगदा' या एकांकिकेसाठी दहा दिवसांपासून तालीम सुरू आहे. चित्रांगदाची भूमिका स्नेहा सयाम साकारत असून सौरभ काळपांडे, अंजली टाले, वृंदावनी पाटकर, स्नेहा तराळ, शुभांगी करुले, प्रियांशू गावंडे हे हरहुन्नरी कलाकार या एकांकिकेमध्ये आपला अभिनय साकारणार आहेत. पार्श्वमंच कलावंत म्हणून अनुराग वानखडे, स्वाती तराळ , तृप्ती मेश्राम, संजीवनी पुरवित हे जबाबदारी सांभाळत आहेत.
महिलांची शौर्यगाथा सांगणारी एकांकिका :चित्रांगदा ही मणिपूरची राणी होती. अतिशय शूरवीर असणाऱ्या या राणीची शौर्यगाथा या एकांकिकेत सादर होणार असून ही चित्रांगदा आजच्या तरुणींसाठी देखील प्रेरणादायक असल्याचं एकांकिकेचं दिग्दर्शक विशाल तराळ म्हणालेत. यापूर्वी 98 व्या नाट्य संमेलनात आम्ही 'चित्रविचित्र' हे नाटक सादर केल्याचंही त्यांनी सांगितलं.
पहिल्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते दादासाहेब खापर्डे :1905 मध्ये मुंबईत आयोजित पहिल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गणेश श्रीकृष्ण खापर्डे उर्फ दादासाहेब खापर्डे हे होते. दादासाहेब खापर्डे हे लोकमान्य टिळकांचे कट्टर अनुयायी होते. भारतीय स्वातंत्र्यासाठी त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं. ते मूळचे विदर्भातील असले, तरी त्यांच्या कार्याची व्याप्ती ही भारतभर होती. राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रासह सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण काम केलं. 1905 मध्ये बालगंधर्व अमरावतीत आले, तेव्हा ते सहा महिने दादासाहेब खापर्डे यांच्या घरीच मुक्काम होते. या काळात दादासाहेब खापर्डे यांच्या मार्गदर्शनात नामदेव गवई यांच्याकडून बालगंधर्व यांनी संगीताचे धडे घेतले. दादासाहेब खापर्डे यांनी देखील अनेक नाटकं लिहिली आहेत. विशेष म्हणजे दीनानाथ मंगेशकर यांच्या परतीच्या काळात दादासाहेब खापर्डे यांनी त्यांना अमरावतीत मोठा आधार दिला. 1930 ते 40 या काळात दीनानाथ मंगेशकर यांची अनेक नाटकं अमरावतीच्या इंद्रभुवन थिएटरसह गणेश थिएटरमध्ये सादर झाली, अशी माहिती अमरावतीचे इतिहासाचे जाणकार असणारे भालचंद्र रेवणे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
हेही वाचा -
- शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा आज शुभारंभ, भव्य रथयात्रेनं रसिकांचं वेधलं लक्ष
- शंभरावे नाट्य संमेलन अहमदनगरला; जब्बार पटेल संमेलनाध्यक्ष, शरद पवार स्वागताध्यक्ष
- महाराष्ट्रव्यापी असेल शंभरावं मराठी नाट्य संमेलन, १३ शहरात होणार साजरे