अमरावती- दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांकडून विम्याच्या नावाने प्रत्येक तिकिटावर एक रुपया आकारात आहे. राज्यात दररोज ६७ लाख प्रवसी राज्य परिवहनच्या बसने प्रवास करीत असून या ६७ लाख गरिबांच्या खिशातील एक रुपया म्हणजे ६७ लाख रुपये रोज मातोश्रीवर जातात, असा आरोप माजी खासदार नाना पटोले यांनी केला आहे.
राज्यातील भाजप- शिवसेना सरकार विरोधात आजपासून काँग्रेसने महापर्दाफाश सभेला प्रारंभ केला. अमरावतीत आयोजित पहिल्या सभेला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, महापर्दाफाश सभेचे प्रमुख नाना पटोले, प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष आमदार यशोमती ठाकूर, प्रदेश महिला काँग्रेस आघाडीच्या प्रमुख चारुलता टोकास, माजी मंत्री नितीन राऊत, आमदार वीरेंद्र जगताप, अमरावती जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बबलू देशमुख, शहर अध्यक्ष किशोर बोरकर आदी उपस्थित होते.
महापर्दाफाश सभेला उपस्थित शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांना नाना पटोले यांनी संबोधित करून भाजप- शिवसेनेच्या युती सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांपासून सारेच मंत्री भ्रष्टाचारी असल्याचा आरोप केला. आज कृषिमंत्री हे अमरावती जिल्ह्याचे आहेत. मात्र घोषणांशिवाय शेतकऱ्यांसाठी काही होताना दिसत नाही. कोल्हापूर, सांगलीत पूर आला, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेत होते. या महाजनादेश यात्रेतून मुख्यमंत्री मुख्य सचिवांना पूरग्रस्तांच्या मदतीबाबत बोलतात, सूचना करतात हे न पटणार होतं. पूरपरिस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या वागण्यावर आम्ही टीका केली, तेव्हा त्यांनी यात्रा थांबविली. फडणवीस सरकारमध्ये जोकर असणारे गिरीश महाजन यांचे पूरपरिस्थितील वागणे सर्वांनी पाहिल्याचेही ते यावेळी म्हणाले.
आज मुख्यमंत्र्यांचे कार्यालय आणि वर्षा या निवसस्थानावर महिन्याला १५ कोटी रुपये खर्च होतो. मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा बंगल्यावर केवळ आरएसएस आणि भाजपच्या पगारी कार्यकर्त्यांची रेलचेल दिसते. या सरकारने शेतकऱ्यांपासून विद्यार्थी, बेरोजगारांची नुसती फसवणूक केली आहे. जागा निघाल्या असे भासवून बेरोजगारांना ऑनलाईन अर्ज भरायला सांगतात. आता गणपती उठल्यावर आचारसंहिता लागणार आहे. यामुळे बेरोजगारांनी ऑनलाईन अर्ज भरताना केलेला खर्च वाया जाणार आहे. इतर मागासवर्गीय तसेच भटक्या व विमुक्त जातींची शिष्यवृत्ती बंद करण्यात आली आहे. फडणवीस सरकार हे फसवणूक करणारे सरकार असून भाजप आणि शिवसेनेने चालविलेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश व्हायलाच हवा असे नाना पटोले यावेळी म्हणाले.
गरिबांच्या खिशातले ६७ लाख रोज जातात मातोश्रीवर; नाना पटोले यांचा आरोप - shivsena
भाजप- शिवसेना सरकार विरोधात आजपासून काँग्रेसने पहिल्या महापर्दाफाश सभेचे उद्घाटन करताना प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी खा. नाना पटोले आदी मान्यवर
17:31 August 26
राज्यातील भाजप- शिवसेना सरकार विरोधात आजपासून काँग्रेसने महापर्दाफाश सभेला प्रारंभ केला
Last Updated : Aug 26, 2019, 10:11 PM IST