अमरावती :कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यात राबविण्यात येणारी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहीम जिल्ह्यात मंगळवारपासून राबविण्यात येत आहे. या मोहिमेत प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट असून, एकही घर मोहिमेतून सुटता कामा नये, असे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने संपूर्ण् राज्यभर येत्या 15 सप्टेंबरपासून 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत आरोग्य विभागाने नियुक्त केलेले स्वयंसेवक शहरातील, तसेच जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत घरोघरी जाऊन लोकांचा ताप आणि ऑक्सिजन लेव्हल तपासणी करणार आहेत. या मोहिमेतून एकही घर सुटता कामा नये. नागरिकांनीही स्वयंसेवकांना सहकार्य करून परिपूर्ण माहिती द्यावी व कोरोना नियंत्रणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री ठाकूर यांनी केले आहे.
लोकांना आरोग्य शिक्षण व महत्वाचे आरोग्य संदेश देणे, तसेच संशयित कोरोना रुग्णांचा शोध घेणे व त्यांना उपचारासाठी संदर्भ सेवा पुरविणे. मधुमेह, हृदयविकार, किडनीविकार, लठ्ठपणा व उपचारासाठी संदर्भसेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे कोरोना रुग्णांच्या संपर्कात आालेल्या संशयितांचा शोध घेऊन त्यांना वेळीच आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.
ही मोहीम पहिल्या टप्प्यात 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरदरम्यान आणि दुसऱ्या टप्प्यात 12 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. एका महिन्याच्या कालावधीत दोनवेळा हे स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबाला भेटणार आहेत. प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणे या मोहिमेमुळे शक्य होणार आहे.