अमरावती- एखाद्या मुस्लीम समाजातील मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नाची पत्रिका हिंदी, इंग्रजी किंवा मग उर्दू अशा भाषेत वाचली असेल. मात्र, अमरावतीच्या वलगाव गावातील मुस्लीम समाजातील तरुणीच्या लग्नाची पत्रिका सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ही लग्न पत्रिका वाचणाऱ्या नेटकऱ्यांनी नववधू व तिच्या कुटुंबाचे कौतुक केले आहे.
अमरावतीच्या वलगाव येथील कुरेशी परिवारात सोनू सबा कुरेशी या तरुणीच्या लग्नाची धामधुम सुरू आहे. कुणी मेहंदी काढताना दिसत आहे, तर कुणी नववधूसोबत गप्पा मारताना दिसतात. आपल्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिकेतून धर्मनिरपेक्षता व समाजाला एकतेचा संदेश देण्यासाठी त्यांनी मुलीच्या लग्नाची पत्रिका ही पूर्णपणे मराठी भाषेत छापली आहे. यामध्ये विवाह स्थळ, विवाह दिनांक आदी मजकूर पूर्णपणे मराठी भाषेत आहे. लग्नासाठी लागणाऱ्या १ हजार पत्रिका पूर्णपणे मराठीमध्ये आहे. हिंदू-मुस्लीम एक असल्याचा संदेश या माध्यमातून द्यायचे असल्याचे नववधुच्या बहिणीने सांगितले आहे.