महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Munda Tradition Amravati: मेळघाटात 'या' जमातीत कुटुंबातील मृतांच्या आठवणीत 'मुंडा' तयार करण्याची प्रथा; मुंडाबद्दल सविस्तर घ्या जाणून

कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या स्मरणार्थ दगडाचा किंवा लाकडाचा मुंडा तयार करून त्याची नियमित पूजा करण्याची आगळीवेगळी प्रथा मेळघाटातील कोरकू जमातीत आहे. मेळघाटात फिरताना अनेक भागात एकाच ठिकाणी अनेक छोट्या मूर्ती रस्त्याच्या कडेला उघड्यावर तसेच छोट्या मंदिरात आढळून येतात. त्या सर्व मुंडा आहेत. या प्रथेविषयी या रिपोर्टमधून अधिक सविस्तर जाणून घेवू या.

By

Published : Apr 27, 2023, 12:36 PM IST

Munda Tradition Amravati
अमरावतीत कोरकू जमातीत मुंडा परंपरा

अमरावतीत कोरकू जमातीत मुंडा परंपरा

अमरावती :कोरकू जमातीत कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या स्मरणार्थ त्यांची लाकडामध्ये किंवा दगडामध्ये मूर्ती कोरली जाते. या प्रकाराला मुंडा असे म्हणतात. व्यक्तीच्या मृत्यूनंतर वर्षभरात हा मुंडा तयार करावा लागतो. प्रत्येकजण आपल्या ऐपतीनुसार दगडात किंवा लाकडामध्ये हा मुंडा घडवतो. हा मुंडा घडविल्यावर आपल्या गोत्रातील सर्व नातेवाईकांना आमंत्रित करून आपापल्या गोत्रानुसार ठरलेल्या जागेवर हा मुंडा धार्मिक विधीसह स्थापन केला जातो. हा संपूर्ण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यावेळी या कार्यक्रमात सहभागी गोत्रातील सर्व नातेवाईकांना बकरा किंवा कोंबडा कापून जेवण दिले जाते.


सात-आठ गाव मिळून एकच ठिकाण :मेळघाटात एकूण सात ते आठ गावात राहणाऱ्या एकाच गोत्रातील लोकांचे मुंडासाठी एकच ठिकाण नेमण्यात आले आहे. परतवाडा ते धारणी मार्गावर बिहाली या गावासमोर काही अंतरावर अनेक मुंडा दिसतात. या स्थळाला गोलादेव असे नाव आहे. या ठिकाणी बिहाली, कोहोना, भाद्री, ढोमणीफाटा, निमकुंड या गावातील एकाच गोत्राच्या लोकांकडला मुंडाचे स्थान आहे. तसेच परतवाडा येऊन चिखलदाराकडे जाताना धामणगाव गढीजवळ असे मुंडा आढळून येतात. या ठिकाणी धामणगाव गढीसह बिलखेडा, मडकी ,मोथा, पिंपळखुटा ,धामणी जयतादेही या गावातील कुटुंबीयांच्या मुंडाचे स्थान आहे. अशाच स्वरूपाचे मुंडा मेळघाटात अनेक ठिकाणी आढळून येतात. बेठे, जामुनकर ,कासदेकर, तोटा, भुसुम, बेठेकर, धिकार अशा गोत्रानुसार हे मुंडा आपल्या गोत्रांच्या ठिकाणी स्थापन केले जातात.


दगडाचा किंवा लाकडाचा मुंडा :घरातील व्यक्तीच्या मृत्यूनंतर वर्षभरात जेव्हा केव्हा घरात पुरेसे पैसे जमा होतात, त्यावेळी मृत पावलेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ कोरकू समाजात मुंडा तयार केला जातो. ज्यांच्याजवळ कमी पैसे जमा झाले ते हा मुंडा लाकडात तयार करतात आणि ज्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत ते दगडात हा मुंडा घडवतात. हा मुंडा घडवणारे कारागीर कोरकू जमातीतलेच आहे. ते चिखलदरा येथील गाविलगड किल्ल्यालगत असणाऱ्या बागलिंगा या छोट्याशा गावात राहतात.

मुंडा घडविणारे कारागीर : लाकडात मुंडा घडविणारे आणि दगडात मुंडा घडविणारे असे दोन प्रकारचे हे कारागीर आहे. ते बागलिंगा ह्या एकाच गावात आहेत. संपूर्ण मेळघाटात ज्यांच्याकडे कोणाचा मृत्यू झाला. त्या व्यक्तींचा मुंडा घडविण्यासाठी बागलिंगा या गावातील कारागीरांकडेच यावे लागते. पूर्वी धान्य घेऊन हे कारागीर मुंडा तयार करून द्यायचे. आता मात्र धान्यासोबत त्यांना ठराविक रक्कम देखील द्यावी लागत असल्याची माहिती मेळघाटातील आदिवासी बांधवांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

प्रत्येक सणाला मुंडाची पूजा :मेळघाटात आदिवासी बांधव जे काही सण साजरे करतात, त्या प्रत्येक सणाला ते मुंडाजवळ घरून शिदोली आणतात. मुंडाजवळ घरून पूजेचे जे काही साहित्य आणले जाते, त्याला शिदोली असे म्हणतात. पोळ्याच्या सणाला मुंडाच्या ठिकाणी संपूर्ण गाव मिळून उत्सव साजरा करतात. यावेळी देखील बोकड कापून सामूहिक जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. ज्या कुटुंबात लग्नकार्य राहते, त्या कुटुंबाच्यावतीने लग्नाची निमंत्रण पत्रिका सर्वात आधी मुंडाजवळ निमंत्रण म्हणून ठेवली जाते.

हेही वाचा : Amravati News: आदिवासी बांधवांची होळी; मेळघाटात होळीची धमाल, तयारी जोमात सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details