अमरावती -अतिवृष्टीमुळे विदर्भातील शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात साजरी होत असताना मुख्यमंत्री दखल घेत नसल्याने शुक्रवारी मोझरी येथे आमदार रवी राणा यांनी आंदोलन केले. याप्रकरणी त्यांना पोलिसांनी अटक केली असताना आता खासदार नवनीत राणा यांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी त्या थेट मुंबई गाठून मुख्यमंत्र्यांचे घर असणाऱ्या मातोश्रीसमोर आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाची भूमिका खासदार नवनीत राणा यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली.
शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळावी यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असणाऱ्या मोझरी येथे आमदार रवी राणा यांनी शेकडो शेतकऱ्यांसह अमरावती-नागपूर महामार्ग अडवून आंदोलन छेडले. शासन जोपर्यंत शेतकऱ्याला मदत देत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, अशी भूमिका आमदार रवी राणा यांनी घेतली. यामुळे त्यांना तिवसा पोलिसानी त्यांना अटक केली. शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या आमदाराला असे अटक करण्याचा प्रकार म्हणजे दडपशाही असल्याचे खासदार नवनीत राणा म्हणाल्या.