अमरावती - शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जात असतानाही पोलिसांनी अटकेचा आदेश कसा काढला, असा प्रश्न खासदार नवनीत राणा यांनी उपस्थित केला आहे. याप्रकरणी मुंबई आणि अमरावतीच्या पोलीस आयुक्तांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच कारवाई होईपर्यंत शांत बसणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई आणि अमरावतीच्या पोलीस आयुक्तांवर कारवाई करा ; अटकेवरून नवनीत राणा आक्रमक काय आहे प्रकरण ?
अतिवृष्टीमुळे विदर्भातील शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर असल्याने आमदार रवी राणा यांनी शुक्रवारी गुरुकुंज मोझरी येथे आंदोलन केले. यावेळी त्यांना अटक करण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या समस्या मुख्यमंत्र्यांना कळायला हव्या, यासाठी आंदोलन केल्यानंतर राणा यांना पोलिसांनी अटक केल्याने नवनीत राणा आक्रमक झाल्या आहेत. आज आमदार रवी राणा यांची सुटका झाल्यानंतर आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी मुंबईला रवाना होणार होते. मात्र त्यांना सायंकाळी 6 वाजता घरातून अटक करण्यात आली. यानंतर त्यांना पोलीस आयुक्तालयात आणले. पोलीस आयुक्तांनी राणा दाम्पत्याशी चर्चा करून त्यांना सोडण्यात येत असल्याचे सांगितले. मात्र, रात्री 9.30 वाजेपर्यंत त्यांची सुटका झाली नव्हती.
लोकसभेत मांडणार प्रश्न
खासदार आणि आमदाराला केवळ मुख्यमंत्र्यांना भेटायला जात असल्याने अटक करणे, हा कुठला कायदा आहे, असा प्रश्न नवनीत राणा यांनी उपस्थित केला. याबाबत मी लोकसभेत प्रश्न उपस्थित करणार असून आमदार राणा हाच विषय विधानसभेत मांडणार आहेत, असे त्या म्हणाल्या. कुठलेही कारण नसताना आम्हला अटक करण्याचे आदेश देणाऱ्या मुंबई आणि अमरावतीच्या पोलीस आयुक्तांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. कारवाई होईपर्यंत शांत बसणार नसल्याचे त्यांनी सांगितले.