अमरावती - गेल्या काही दिवसांपासून वाझे प्रकरणावरून राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. त्याचे पडसाद लोकसभेतही उमटले. लोकसभेत शिवसेना खासदार अरविंद सावंत आणि नवनीत राणांचा वाद चांगलाच पेटला. त्यानंतर पुन्हा नवनीत राणांनी शिवसेनेला लक्ष्य केले आहे. जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे होते, तोपर्यंत शिवसेनेत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जिवंत होते. परंतु बाळासाहेब ठाकरे गेले आणि शिवसेनेत महिलांचा आदर संपला, अशी टीका राणा यांनी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत प्रकरणी बोलताना लोकसभेत केली.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिन्याला शंभर कोटीच्या वसुलीची काम सचिन वाझेंना दिल्याचा आरोप करत राज्यात "लेटरबॉम्ब" फोडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या लेटर बॉम्ब चे पडसाद भाजपने लोकसभेत उमटवले होते. १०० कोटींच्या वसुलीचे काम हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच होत असल्याचा गंभीर आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारभाराविरोधात बोलत असल्याने मला शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी जेलमध्ये टाकण्याची धमकी दिल्याची तक्रार खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना लिहलेल्या पत्रात केली होती.
लोकसभेत बोलताना नवनीत राणा.. रक्ताचे पाणी करून मी या सभागृहात पोहोचली - लोकसभेत बोलताना खासदार नवनीत राणा म्हणाल्या, की या सभागृहाने आणि संविधानाने लोकांचे प्रश्न मांडण्याचा अधिकार मला दिला आहे. मागील नऊ वर्षात दिवस-रात्र एक करून मी या सभागृहात पोहोचली आहे. रक्ताचे पाणी करून मेहनत करून मी इथे आली आहे. कोणत्याही पक्षाच्या कुठल्याच नेत्याच्या धमक्यांना घाबरण्यासाठी मी इथे आलेली नाही. जर कुणी मला बाहेर धमकावण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याच्याशी कसे लढायचे हे माहीत आहे, असेही राणा म्हणाल्या.
१०० कोटींच्या वसुली प्रकरणी काय बोलल्या होत्या नवनीत राणा -
महाराष्ट्रात खंडणी वसुली करण्याचे काम सुरू आहे. त्यावरुन मी सांगू इच्छिते की, जो व्यक्ती १६ वर्ष निलंबित होता, सात दिवस जेलमध्ये राहिला त्याला कोणत्या आधारे पुन्हा सेवेत घेतले. जेव्हा भाजपाचे सरकार होते तेव्हा उद्धव ठाकरेंनी सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घेण्यास सांगितले होते. मात्र, फडणवीसांनी यासाठी स्पष्ट नकार दिला होता. ज्यादिवशी ठाकरे सरकार आले तेव्हा परमबीर सिंह यांना फोन करुन सर्वात आधी सचिन वाझेंना सेवेत घेतले. सचिन वाझेंमुळे परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली, असे नवनीत राणा म्हणाल्या होत्या.
तर संपूर्ण महाराष्ट्रातून किती वसुली होत असेल -
जर अशा पद्धतीने खंडणी वसुल करण्याचे काम सुरू झाले तर संपूर्ण देशातही असे होऊ शकते. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुनच हे सगळं सुरू आहे. बदल्या करणे, खंडणी वसुल करणे यामध्ये इतर कोणीही सहभागी नाही. एकट्या मुंबईतून महिन्याला १०० कोटी वसुली होत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातून किती होत असेल?, अशी विचारणा नवनीत राणा यांनी यावेळी केली होती.
हेही वाचा -वाझे-हिरेन भेटीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर; हत्याकांडसंदर्भात समोर आले मोठे खुलासे