अमरावती - 11 महिन्याच्या बाळाला विषमिश्रीत दूध पाजून आईने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. धनेगाव येथे रविवारी (दि 23) ही ह्रदयद्रावक घटना घडली. या घटनेत बाळाचा मृत्यू झाला असून आईची प्रकृती सुद्धा गंभीर आहे. बाळाच्या अंत्यविधीवेळी संपूर्ण धनेगाववासी हळहळल्याचे चित्र पाहायला मिळाले. या घटनेमुळे पंचक्रोशीत दुःख व्यक्त केले जात आहे.
सुमारे दोन वर्षांपूर्वी लग्न झालेल्या प्रिया कुलदीप येवले (वय 23 रा. धनेगाव) या महिलेने आत्महत्या करण्याच्या हेतूने शनिवारी विषारी औषध प्राशन केले. आपल्यानंतर मुलाचे काय होणार या विचाराने तिने आपल्या कुंज या अकरा महिन्याच्या मुलाला सुद्धा विष मिश्रीत दूध पाजले. दोघांनाही रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान शनिवारी रात्री कुंजचा मृत्यू झाला. बाळाची आई प्रियाची प्रकृती सुद्धा गंभीर असून तीच्यावर अमरावती येथील एका खासगी दवाखान्यात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.