अमरावती - गेल्या 15 दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावली. त्या दरम्यान महानगर पालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या वृंदावन कॉलनी परिसरातील सदाशांती या अनाथ मुलांच्या बालगृहकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील नाल्याचा कच्चा पूल 13 ऑगस्टला वाहून गेला होता. त्यानंतर माध्यमात बातम्या आल्यानंतर अधिकाऱ्यांनी या पुलाची पाहणी करत पूल बांधून देण्याचे आश्वासन दिले. परंतु, दहा दिवस उलटूनही पुलाच्या कामाला सुरुवात झाली नाही.
जिल्ह्यातील अनाथ व बेघर असलेल्या 1 ते 18 वयोगटातील मुलींचा सांभाळ वृंदावन कॉलनीस्थित सदाशांती बालगृह करत आहे. हे बालगृह बहुउद्देशीय आरोग्य व समाज कल्याण संस्थेद्वारे संचालित असून गेल्या 27 वर्षांपासून कार्यरत आहे. या बालगृहाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील नाल्यावर पंधरा वर्षांपूर्वी कच्च्या पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. परंतु, दहा दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे 13 ऑगस्टला हा पूल वाहून गेला. त्यामुळे सदाशांती बालगृहातील 19 मुले दोन महिला कर्मचारी व एक चौकीदार अडकून पडले आहेत.