अमरावती :रस्त्याने जात असणाऱ्या बहीण भावांना अडवून एका 58 वर्षीय व्यक्तीने त्यांना थेट मला तुमची आई पसंत आहे, असे म्हटल्यामुळे दोन्ही मुले हादरले. मुलांनी हा प्रकार त्यांच्या आईला सांगितल्यावर या कुटुंबाने थेट पोलीस स्टेशन गाठून संबंधित व्यक्ती विरोधात तक्रार दिली. ही घटना १२ जून रोजी घडली. लक्ष्मण खियानी असे या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणात महिलेने दिलेला तक्रारीवरून गाडगे नगर पोलिसांनी लक्ष्मण खियानी याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. लक्ष्मण खियानी या व्यक्तीचा प्रताप पाहून पोलीसही चक्रावले आहेत.
'असे' आहे प्रकरण :गाडगे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक महिला बाजारात भाजी आणण्यासाठी गेली असताना लक्ष्मण खियानी हा 58 वर्षीय व्यक्ती तिच्याकडे सतत पहात होता. त्याला घाबरून ती घरी परतत असताना त्याने तिचा घरापर्यंत पाठलाग केला. बऱ्याच वेळापर्यंत तो तिच्या घरासमोर उभा होता. त्याच्या या वागण्याबाबत महिलेच्या शेजारच्या व्यक्तींनी त्याला टोकले असता या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर माझी गर्लफ्रेंड राहते, असे तो परिसरातील व्यक्तींना म्हणाला.