अमरावती - मागील 55 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांचे शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे. मागील 55 दिवसांपासून त्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. आता अपेक्षा होती की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करतील. पण तसे झाले नाही कारण पंतप्रधान मोदींचा हेकेखोरपणा आडवा आला आहे, अशी जहरी टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे.
प्रजासत्ताक दिनी मागण्या पूर्ण कराव्या
कृषी कायदे रद्द करण्यासाठी राज्या राज्यात शेतकऱ्यांचे आंदोलन पेटले आहे. खरे तर प्रजासत्ताक देशात प्रजा ही राजा असली पाहिजे. मग देशाचे पंतप्रधान असो की राज्याचे मुख्यमंत्री, आमदार, खासदार हे त्याचे सेवक असले पाहिजे. मात्र मोदींचे सरकार हे विसरले आहे की प्रजा राजा आहे आणि आपण सेवक आहे. परंतु आता प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आम्हाला अपेक्षा आहे की शेतकरी राजाने कृषी कायद्या संदर्भात केलेल्या मागण्या पूर्ण कराव्या, अन्यथा देशभरात उग्र आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही, असेही राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले.