यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया अमरावती Melghat Hat:सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या मेळघाटात आता 'मेळघाट हाट' नावाचा अत्याधुनिक मॉल सुरू झाला आहे. या मॉलमध्ये आदिवासी महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंसह गहू, कोदो, कुटकी, दुग्धजन्य पदार्थ, कॉफी, स्ट्रॉबेरी, मध, यांच्यासह विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळं मेळघाटातील आदिवासी बांधवांना आर्थिक फायदा होणार आहे. त्यामुळं या मॉलला अमरावतीकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
असं आहे 'मेळघाट हाट' मॉलचं वैशिष्ट्यं :जंगलातील अतिशय शुद्ध 'मध' प्रत्येकाला हवा असतो. मात्र तो प्रत्येक ठिकाणी मिळण्याची शक्यता नसते. तसंच मेळघाटात अतिशय दर्जेदार गहू सातपुडा पर्वत रांगेत येतो. राज्यातील एकमेव कॉफीचं उत्पादन देखील मेळघाटातील चिखलदऱ्यात होतं. यासह स्ट्रॉबेरीचं उत्पादन देखील मेळघाटात घेतलं जातं. दुधाचा दर्जेदार खवा, रानमेवा मेळघाटाची खास ओळख आहे. मेळघाटातील या सर्व वस्तूंचं महत्त्व अनेकांना महिती आहे. मात्र, त्यासाठी मेळघाटात जाणं सर्वांना शक्य नसतं. त्यामुळं अनेकजण या शुद्ध पदार्थांपासून वंचित राहतात. त्यामुळचं मेळघाटात 'मेळघाट हाट' मॉलची संकल्पना साकारण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या सायन्स कोर मैदानालगतच महिला आर्थिक विकास महामंडळद्वारे हा मॉल सुरू करण्यात आला आहे. या मॉलची बांधणी अतिशय सुंदर असून या मॉलमध्ये प्रवेश केल्यावर आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडतंय.
बांबूचे साहित्य आहे खास आकर्षण : 'मेळघाट हाट'मध्ये असणाऱ्या सर्वच वस्तू आदिवासी बांधवानी तयार केल्या आहेत. या वस्तू बांबूपासून तयार करण्यात आल्या असून त्या खास आकर्षण ठरत आहेत. डायनिंग टेबल, सोफा सेट, भिंतीवरील घड्याळ, आकर्षक फुलदाणी, लाकडी साहित्यापासून तयार करण्यात आलेली खेळणी, महिलांच्या शृंगारसाठी हेअर पिन क्लचर अशा सर्वच वस्तू या ठिकाणी उपलब्ध आहेत.
मेळघाटातील महिला बचत गटांना रोजगार :या संदर्भात बोलतानाआमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या की, या मॉलमुळं आदिवासी महिलांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहे. तसंच ग्राहकांना देखील चांगल्या वस्तू मिळणार आहेत. त्यामुळं आदिवासी संस्कृतीचं देखील जतन होणार आहे. यशोमती ठाकूर अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री असताना त्यांनी यासंदर्भात 'मेळघाट हाट'ची संकल्पना मांडली होती. मेळघाटातील महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध व्हावा, हा त्यामागचा उद्देश होता. आज मेळघाटात 2 हजार 350 पेक्षा अधिक महिला बचत गट आहेत. या बचत गटांना 25 हजाराहून अधिक महिला जोडल्या आहेत. या बचत गटांच्या माध्यमातून मेळघाटात विविध वस्तू तयार करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या बचत गटाच्या माध्यमातून महिलांद्वारे गांडूळ खत निर्मिती देखील केली जात आहे. मेळघाटातील गांडूळ खत हे अतिशय दर्जेदार असून शेतीसाठी फायदेशीर ठरत आहे. गांडूळ खतासह बचत गटांनी तयार केलेल्या सर्वच वस्तूंना शहरी भागात प्रचंड मागणी आहे.
यशोमती ठाकूर म्हणतात माझं 'ब्रेन चाइल्ड' :मी पालकमंत्री असताना मेळघाटात अनेकदा गेले. त्यावेळी आदिवासी संस्कृतीतील अतिशय दर्जेदार वस्तूंना बाजारपेठ मिळावी, या उद्देशानं मेळघाट हाट ही संकल्पना समोर आली. मेळघाट हाट हे माझं ब्रेन चाइल्ड असल्याचं आमदार यशोमती ठाकूर यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितलं. केवळ आपल्या महाराष्ट्रात असणारा मेळघाटच नव्हे, तर मध्य प्रदेशात येणाऱ्या मेळघाटातील आदिवासी बांधवांचं साहित्य देखील या मॉलमध्ये येण्यासाठी माझे प्रयत्न होते. संपूर्ण देशात 'मेळघाट हाट' हा एक ब्रँड व्हावा, अशी इच्छा देखील आमदार यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केलीय.
हेही वाचा -
- राष्ट्रवादीतील वाद प्रकरण; प्रकाश सोळंकेंना कार्याध्यक्षपदाची ऑफर कुणी दिली ? जयंत पाटलांचा अजित पवारांना सवाल
- मराठा आंदोलकांचा विरोध; अजित पवारांचा संभाजीनगर दौरा रद्द होण्यामागचं खरं कारण काय?
- आमच्याशी दगाफटका करु नका नाहीतर जड जाईल; मनोज जरांगे पाटलांचा इशारा