अमरावती- अप्पर वर्धा धरणातील पाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तिवसा तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांसाठी वर्धा तलावात पाणी सोडणे आणि त्यानंतर लगेच बंद करण्यात आले होते. याच पाण्याचा प्रश्न घेऊन आमदार यशोमती ठाकूर आणि तिवसा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्तालयात ठिय्या दिला आहे.
अप्पर वर्धा धरणाच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांसह यशोमती ठाकूर यांचा विभागीय आयुक्तालयात ठिय्या - विभागीय आयुक्त
अप्पर वर्धा धरणातील पाणी प्रशासनाने सोडले आणि बंदही केले. आम्ही पाण्याची मागणी केली होतीच, मात्र भाजपच्या आमदारांनी केवळ राजकारण करण्यासाठी पाण्यासारख्या विषयावरून गैरप्रकार चालवला असल्याचा आरोप आमदार ठाकूर यांनी केला
अप्पर वर्धा धरणातील पाणी प्रशासनाने सोडले आणि बंदही केले. आम्ही पाण्याची मागणी केली होतीच, मात्र भाजपच्या आमदारांनी केवळ राजकारण करण्यासाठी पाण्यासारख्या विषयावरून गैरप्रकार चालवला असल्याचा आरोप आमदार ठाकूर यांनी केला आहे. विभागीय आयुक्त यांच्यासमोर आमदार ठाकूर यांनी तिवसा मतदारसंघातील विविध गावांची परिस्थिती मांडली. अनेक गावांमध्ये आज टँकरची गरज आहे. मात्र, टँकर पोहचत नाही. ज्या गावात टँकर पोहचले तिथे ग्रामस्थांना पाण्यासाठी पैशांची मागणी होत आहे. विहीर खोलीकरणाचे अनेक प्रस्ताव दोन महिन्यांपासून प्रलंबित आहेत. असे अनेक विषय आमदार ठाकूर यांनी विभागीय आयुक्तांच्या लक्षात आणून दिले.
विभागीय आयुक्त पीयूषसिंग गोयल यांनी अप्पर वर्धा धरणातील पाणी सोडण्याबाबत आणि ते सोडल्यावर बंद करण्यामागे नेमके काय कारण आहे, टँकरने पाणी पुरवठा करण्यात काय अडचणी आहेत. याबाबत सर्व संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलवली आहे. या बैठकीत तिवसा मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न सुटेपर्यंत आम्ही सर्व विभागीय आयुक्तालयातून हलणार नाही, अशी भूमिका आमदार यशोमती ठाकूर यांनी घेतली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विभागीय आयुक्तालयात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे.