अमरावती- भातकुली व बडनेरा तालुक्यातील अनेक गावामध्ये सध्या पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये अधिकारी हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप करत बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांनी शाखा अभियंत्याला चांगलेच खडे बोल सुनावले. आज (मंगळवार) घेतलेल्या पाणीटंचाईच्या बैठकीत त्यांचा रुद्रावतार पाहायला मिळाला. मला आता लोकांच्या तक्रारी आल्या तर तिथेच मार देणार? अशी धमकी वजा इशाराच राणांनी अभियंत्याला दिला. यामुळे बैठकीत एकच खळबळ उडाली. आमदार रवी राणा एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी बैठकीदरम्यान त्या अभियंत्याला चक्क जमिनीवर बसवले आणि त्याला शिवीगाळही केली.
आमदार रवी राणा यांनी आज महानगरपालिका, जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली होती. कुठल्याच परिस्थितीत जिल्ह्यातील नागरिक पाण्यापासून वंचित राहणार नाही, यासाठी अधिकारी व कर्मचारी यांनी दक्ष राहावे, हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड दम आमदार रवी राणा यांनी भरला. भर बैठकीत त्यांनी शाखा अभियंता पुरोहित यांना लोकांच्या तक्रारी आल्यास तिथेच मार देणार, अशी धमकी दिली. तसेच त्यांनी बैठक संपेपर्यंत पुरोहित यांना जमिनीवर बसवून शिवीगाळही केली.