अमरावती- मेळघाटच्या गुगामल वन्यजीव परीक्षेत्राच्या लेडी सिंघम असलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी (आरएफओ) दिपाली चव्हाण यांनी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहलेल्या चार पानाच्या चिठ्ठीमध्ये वरिष्ठ अधिकारी शिवकुमार कसा मानसिक छळ करत होते आणि त्याला वरिष्ठ अधिकारी कसे अभय देत होते, याची माहिती दिली आहे. शिवकुमार यांची त्यांनी अनेकदा वरिष्ठांना तक्रार केली होती. खासदार नवनीत राणा यांनाही माहिती देऊन वरिष्ठ अधिकारी शिवकुमार यांच्यावर कुठलीच कारवाई करत नसल्याचे त्यांनी सांगितले होते. अखेर त्यांना आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलावे लागले.
दिपाली चव्हाण यांना शिवकुमार त्रास देत असल्याची तक्रार आमदार रवी राणा यांनी पाच महिन्यांपूर्वी तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांना पत्र लिहून केली होती. आमदार रवी राणा यांची सही असलेले हे पत्र सध्या समोर आले आहे.
माहिती देताना आमदार रवी राणा पत्रात काय म्हणाले होते रवी राणा
अमरावती जिल्ह्यातील हरिसाल जवळील गुगामल वनपरिक्षेत्रात वनपरिक्षेत्र अधिकारी या पदावर श्रीमती दिपाली चव्हाण या कार्यरत आहे. त्यांनी मला व खासदारांना अनेकदा त्यांच्या विभागातील वरिष्ठ अधिकारी उपवनरक्षक विनोद शिवकुमार हे श्रीमती दीपाली चव्हाण यांना सतत मानसिक त्रास देतात अशी तक्रार आमच्याकडे केली. व माझी इतरत्र बदली करण्यात यावी, अशी मागणी सुद्धा त्यांनी केली. यासंदर्भात मी व खासदार यांनी दीपाली चव्हाण यांची बदली संदर्भात व त्यांना होणाऱ्या मानसिक त्रासाबाबत अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावतीचे श्रीनिवास रेड्डी यांना वारंवार सांगितले. परंतु, श्री रेड्डी हे या प्रकरणामध्ये हलगर्जीपणा दाखवत आहेत व दुर्लक्ष करत आहेत. म्हणून आपणास विनंती करण्यात येते की, वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती दिपाली चव्हाण या महिला असल्याकारणाने व त्यांना उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याचा मानसिक त्रास होत असल्यामुळे यांना इतर ठिकाणी बदली द्यावी. तसे शक्य न झाल्यास गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा येथील कार्यालयात उपवनरक्षक विनोद शिवकुमार यांची तत्काळ बदली करण्याचे आदेश आपणाकडून संबंधितांना द्यावेत, अशी मागणी आमदार रवी राणा यांनी चार महिन्यांपूर्वी पत्राद्वारे केली जात होती.
आमदार रवी राणा यांनी लिहिलेले पत्र काय म्हणाल्या खासदार नवनीत राणा
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मुख्य वनरक्षक श्रीनिवास रेड्डी व उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्यावर दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून निलंबित करण्याची मागणी केली आहे. माझ्याकडे मृत दिपाली आली होती तिने मला घडलेला प्रकार व रेकॉर्डिंग ऐकून दाखवली होती. त्यानंतर मी रेड्डी यांच्याशी बोलून दिपाली चव्हाणची बदली करण्याची मागणी केली होती. तरी सुद्धा यावर दुर्लक्ष केले गेले, महिला अधिकाऱ्याचा मानसिक छळ केला गेला, त्यामुळे आता यावर दिपाली चव्हाण हिच्या आत्महत्येप्रकरणी आरोपीवर कठोर शिक्षा झाली पाहिजे. मुख्य वनरक्षक रेड्डी आणि विनोद शिवकुमार यांच्यावर आत्महत्या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नवनीत राणा यांनी केली आहे.