अमरावती - शहरातील राजापेठ येथील भुयारी मार्गाचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. त्यात शनिवारी (3 जुलै) आमदार रवी राणा यांनी आपल्या मर्जीने अर्धवट काम झालेल्या भुयारी मार्गाचे लोकार्पण केले. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी मास्कही लावला नव्हता. यावेळी युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली. मात्र, यानंतर रवी राणा यांनी कोरोना नियमांची पायमल्ली केल्याची ओरड सुरू झाली.
असा आहे भुयारी मार्ग
अमरावतीच्या प्रतिभा पाटील या देशाच्या राष्ट्रपती झाल्यानंतर 2008 मध्ये अमरावती रेल्वे स्थानकाचे रूपांतर मॉडेल रेल्वे स्थानकात झाले. त्यानंतर या रेल्वे स्थानकावरून अमरावती-मुंबई, अमरावती-तिरुपती, अमरावती-पुणे या गाड्या धावायला लागल्या. राजापेठ रेल्वे क्रॉसिंगवर वाहतुकीला अडथळा येऊ नये म्हणून रेल्वे रुळावरून उड्डाणपुलाची निर्मिती झाली. याचवेळी रेल्वे रुळाच्या खालून भुयारी मार्गही प्रस्तावीत करण्यात आला.
म्हणून आमदारांनी केले लोकार्पण
दस्तुरनगर, राजापेठ अशा मोठ्या लोकसंख्येच्या परिसराला जोडणाऱ्या उड्डाणपूलाचे लोकार्पण लोकसभा निवडणुकीपूर्वी झाले होते. तेव्हापासून भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, तीन वर्षे उलटूनही हे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यामुळे आमदार राणा यांनी राजापेठ ते दस्तूर नगरकडे जाणाऱ्या मार्गाचे आज लोकार्पण केले.