अमरावती MLA Nitin Deshmukh March :अकोला जिल्हा परिषदेत उद्धव ठाकरे गटाचे सदस्य गोपाल दातकर यांच्या हिंगणी बुद्रुक येथील शेतातून जाणाऱ्या रस्त्या संदर्भात गावातील एका व्यक्तीने जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली होती. या तक्रारीवर तहसीलदारांनी पंचनामा करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात सुनावणी घेऊन विभागीय आयुक्तांकडे गोपाल दातकर यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व अपात्रतेचा प्रस्ताव पाठविला. 21 जुलैला पाठविलेल्या या प्रस्तावावर विभागीय आयुक्तालयातून दुसऱ्याच दिवशी हा प्रस्ताव नियमबाह्य असल्याचे कारण देऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे परत पाठवण्यात आला होता. असं असताना 25 जुलैला विभागीय आयुक्तांनी हा प्रस्ताव राज्य शासनाकडे देखील पाठवला. कोणत्याही जिल्हा परिषद सदस्यविरुद्ध तो गैरप्रकार करीत असेल किंवा कर्तव्य बजावण्यास सक्षम नसेल तर जिल्हा परिषद अधिनियम कलम 39 नुसार त्याला अपात्र करता येते. त्यासाठी सभागृहात उपस्थित सदस्यांपैकी दोन तृतीयांश सदस्यांनी अपात्र करण्याची शिफारस करणारा ठराव मंजूर करणे आवश्यक आहे. त्यानंतर असा ठराव शासनाकडे पाठविला जातो. मात्र गोपाल दातकर यांच्या प्रकरणात या नियमाचे पालन झाले नाही असं आमदार नितीन देशमुख म्हणाले.
विभागीय आयुक्तांशी दोन तास चर्चा :गोपाल दातकर यांच्या विरोधात त्यांच्या हिंगणी बुद्रुक गावातील एका व्यक्तीने राजकीय हेतूने तक्रार केली. यानंतर त्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन त्यांच्या अपात्रतेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तालयात अधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठविला. पुढे अकोल्यातील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये प्रचंड रोष उफाळून आला. राजकीय द्वेषबुद्धीने गोपाल दातकर यांच्यावर झालेल्या कारवाईसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असल्याचा आरोप करत आज आमदार नितीन देशमुख शेकडो कार्यकर्त्यांसह विभागीय आयुक्तालयात पोहोचले. या विषयावर विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे यांच्यासोबत आमदार नितीन देशमुख यांनी सुमारे दोन तास चर्चा केली. गोपाल दातकर यांच्यावर झालेली कारवाई अयोग्य असल्याचे विभागीय आयुक्तांनी देखील मान्य केले, असे आमदार नितीन देशमुख पत्रकारांशी बोलताना म्हणाले.