अमरावती : आपल्याकडे मुंबई व पुणे येथे सदनिका व कारखाने असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे सदर सदनिका व कारखाने आपल्या ताब्यात देण्यात येवून आपल्यावर कारवाई करावी अशी आपली मागणी आहे. आपल्याकडे बेहिशेबी मालमत्ता असतांना आपण गाडीत डिझेल कुठून टाकतो असा प्रश्न अधिकाऱ्यांनी आपणास विचारला. परंतु, आपण गुवाहाटी येथे जाण्यासाठी चार्टर्ड प्लेनचा वापर कसा केला याचा प्रश्न त्यांनी केला नाही, याबाबत आमदार देशमुख यांनी आश्चर्य व्यक्त केले. आमदार नितीन देशमुख यांची आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सुमारे तीन तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर देशमुख प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
सर्वांच्या पाठीशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : विरोधी पक्षातील लोकांच्या विरोधात जाणीवपूर्वक मोहीम : इडी, सीबीआय, एसीबी, या तपास संस्थांच्या माध्यमातून मराठी लोकांनाच लक्ष्य केले जात आहे. आत्तापर्यंत २४ मराठी माणसांवर कारवाई झाली आहे. नाहीतर त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. विरोधी पक्षातील लोकांच्या विरोधात सत्ताधारी नेत्यांनी जाणीवपूर्वक मोहीम उघडल्याचे दिसून येत आहे. तसेच, आरोप करणाऱ्यांमध्ये निवडक हिंदी भाषिक लोक आहेत. राणा दाम्पत्य, किरीट सोमय्या, मोहित कंबोज यासारखे लोक चुकीचे आरोप करीत सुटले आहेत. या सर्वांच्या पाठीशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. हे त्यांचेच कारस्थान आहे, असा आरोप नितीन देशमुख यांनी केला आहे.
मराठी लोलांवर आघात :भाजप काही विशिष्ट लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मराठी लोकांवर आघात करत आहे. आतापर्यंत आनंदराव अडसूळ, शरद पवार, अनिल देशमुख, छगन भुजबळ, अनिल परब, संजय राऊत, वैभव नाईक, राजन साळवी, भावना गवळी, अजीत पवार, किशोर पेडणेकर, अविनाश भोसले, मराठी व्यावसायिक, जेमिनी जाधव, यशवंत जाधव, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सचिन जोशी लोकांना ईडीने नोटीस दिली आहे. आमदार संतोष बांगर यांना देखील धमकावून शिंदे गटात आणले आहे. खासदार प्रतापराव जाधव, खासदार हेमंत पाटील यांना देखील नोटीस देण्यात आली. सुषमा अंधारे यांना घातपाताचा धमकी दिली होती. २४ जणांना नोटीस देण्यात आली. ही सर्व मराठी आहेत. परंतु, यातील शिंदे व भाजपात गेलेल्यांची चौकशी झाली नाही. कारवाई देखील करण्यात आली नाही. त्यांना पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे असही देशमुख यावेळी म्हणाले आहेत.