अमरावती- मोर्शी वरुड तालुक्यात सध्या नाकतोडे या किटकांच्या धाडीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सद्या उन्हाळा असून बहुसंख्य शेतातील संपूर्ण पिके काढण्यात आलेली आहेत. परंतू संत्रा बागायतदार शेतकऱ्यांच्या संत्रा झाडांवर टोळधाडीचा प्रकोप झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वरुड - मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
टोळधाडीमुळे नुकसान झालेल्या मोर्शी वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांना भरपाई द्या मोर्शी, वरुड, नरखेड, आष्टी या तालुक्यात टोळकीटकांनी शेतावर हल्लाबोल केलेला आहे. शेजारील राज्य मध्य प्रदेश येथून हे टोळ महाराष्ट्रात आलेली आहे. यामुळे शेतकरीबांधव पूर्णतः गोंधळून गेले आहेत. मागील १० वर्षांपासून मोर्शी वरुड तालुक्यातील शेतकरी संकटांचा सामना करत आहे. आता पुन्हा एकदा या किटकांनी धाड मारली असताना आता काय करावे, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. अशा संकटकाळात कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवश्यक ते मार्गदर्शन करावे व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी शासनाला केली आहे.
मागील वर्षी भीषण दुष्काळाचा सामना करून मोर्शी वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांनी संत्रा बागा वाचवल्या. यावर्षी सुरुवातीला परिसरातील शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाशी मोठा सामना करावा लागला. या संकटातून सावरून शेतकरी वर्गाने उधार-ऊसणवारी करत संत्राचा, मोसंबीचा बहार टिकवला. रब्बी हंगामातील भाजीपाला, भुईमूग या पिकांची पेरणी केली. पिकाची वाढ होत असतानाच आता पुन्हा या पिकांना टोळ धाडमुळे नजर लागली आहे. मोर्शी वरुड तालुक्यात या टोळधाडीने धुमाकूळ घातलेला आहे.
मोर्शी वरुड तालुक्यात २५ मे रोजी प्रवेश केला असून टोळ धाडीने मोर्शी वरुड तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. टोळ धाडीवर महागड्या औषधांची फवारणी करूनही त्यावर नियंत्रण येत नसल्यामुळे संशोधकांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याची गरज आहे. मात्र कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी सध्या कार्यालयात बसूनच शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचे धडे देत असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये होत आहे. त्यामुळे आता शासनाने तातडीने योग्य पावले उचलण्याची गरज आहे.