अमरावती -राज्यात सरकार स्थापन व्हावे याची आतुरता शेतकऱ्यांसह सर्व जनतेला लागली आहे. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सरकार स्थापन होणे अत्यंत गरजेचे आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकार स्थापनेसाठी सध्या शकुंतला गाडी प्रमाणे विचार करत आहेत. मात्र, कुठलाही अधिक विचार न करता शकुंतला ऐवजी दोन्ही काँग्रेसने आपल्या निर्णयाचा वेग हा गीतांजली एक्सप्रेस प्रमाणे वाढवायला हवा, असे मत आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे.
सरकार बनवण्यासाठी दोन्ही काँग्रेसने घ्यावा गीतांजली एक्सप्रेसचा वेग - बच्चू कडू - Maharashtra power struggle News
राज्यात सरकार स्थापन व्हावे याची आतुरता शेतकऱ्यांसह सर्व जनतेला लागली आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेसने गीतांजली एक्सप्रेस प्रमाण वेग वाढवून निर्णय घ्यावा असे मत आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केले.
![सरकार बनवण्यासाठी दोन्ही काँग्रेसने घ्यावा गीतांजली एक्सप्रेसचा वेग - बच्चू कडू](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5104665-1034-5104665-1574086781852.jpg)
अचलपूर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या अडचणी मांडण्यासाठी आमदार बच्चू कडू जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार बच्चू कडू म्हणाले राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. राज्यपालांनी शेतकऱ्यांना मदतीसाठी नुकसान झालेल्या फळपिकांना हेक्टरी 18000 रुपये आणि कोरडवाहू पिकांसाठी 8 हजार रुपये मदतीची घोषणा केली आहे. आज जर सरकार स्थापन झाले तर मंत्रिमंडळ शेतकऱ्यांच्या मदतीबाबत राज्यपालांना पेक्षा अधिक चांगला निर्णय घेऊ शकते.
मंत्रिमंडळ अस्तित्वात असते तर शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान झालेल्या कोरडवाहू पिकांसाठी 15 ते 20 हजार रुपये पर्यंत मदत मिळाली असती. आता लवकरच सरकार स्थापन होईल, अशी मला आशा आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी विचारधारा वगैरेबाबत अधिक विचार न करता सरकार स्थापनेसाठी गीतांजली एक्सप्रेसच्या वेगाने निर्णय घ्यावा आणि महाराष्ट्राचे भले करावे, असे आमदार बच्चू कडू म्हणाले.