अमरावती :आमदार बच्चू कडू यांनी माजी मंत्री यशोमती ठाकूर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या गटातील तीन संचालकांच्या भरवशावर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आपली सत्ता स्थापन केली. अध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर आमदार बच्चू कडू यांच्या कार्यकारिणी मंडळाची पहिलीच बैठक मात्र फसली आहे. बबलू देशमुख गटाचे तेराही संचालक पुन्हा एकत्र आले. त्यामुळे शुक्रवारी पार पडलेल्या या बैठकीला 13 संचालक अनुपस्थित राहिले. त्यामुळे अल्पमतातील या कार्यकारिणीला अखेर बैठक स्थगित करावी लागली.
कार्यकारी मंडळ अल्पमतात :गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा मध्यवर्ती बँकेवर काँग्रेसचे वर्चस्व होते. यावेळी मात्र आमदार बच्चू कडू यांनी बबलू देशमुख गटाच्या तीन संचालकांना फोडले. बच्चू कडू यांनी बँकेवर बळजबरीने आपली सत्ता प्रस्थापित केली, असा दावा बबलू देशमुख यांनी केला आहे. परंतु, या सत्ताकारणानंतर मात्र त्या तीन संचालकांना आपली चूक कळल्यानंतर ते पुन्हा बबलू देशमुख गटात सहभागी झाले, त्यामुळे बहुमत बबलू देशमुख गटाकडे असल्याने तेराही संचालक शुक्रवारच्या बैठकीला अनुपस्थित राहिले. अध्यक्ष झाल्यानंतर आमदार बच्चू कडू यांची पहिलीच कार्यकारिणी मंडळाची ही बैठक अयशस्वी झाली. अखेरीस अल्प मतातील या कार्यकारिणी मंडळाला ही बैठक स्थगित करावी लागली.