अमरावती- अप्पर वर्धा धरणातून तिवसा मतदारसंघात सोमवारी सोडण्यात आलेले पाणी केवळ आमदार यशोमती ठाकूर यांच्या अट्टाहासाने वाया गेले असल्याचा आरोप आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश दबावतंत्राचा वापर करून आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रशासनास पाणी सोडण्यास भाग पाडले असल्याचेही आमदार डॉ. बोंडे म्हणाले.
जलसंपदा विभागात सोमवारी आमदार यशोमती ठाकूर यांनी मुख्य अभियंता रवींद्र लांडेकर यांच्याविरोधात घेतलेल्या भूमिकेचा आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी निषेध नोंदवला. आज पत्रकार परिषद बोलावून आमदार अनिल बोंडे म्हणाले, अप्पर वर्धा धरणात तिवसासाठी 0.2 दशलाख घनमीटर पाणी आहे. इतके पाणी आज उन्हाळयाच्या दिवसात तिवसा पर्यंत पोहचू शकत नाही, हे ठाऊक असताना आमदार ठाकूर यांनी शिवीगाळ करित दबाव आणला. आमदार ठाकूर यांच्या दबावात येऊन पालकमंत्री आणि अधिकाऱ्यांनी अप्पर वर्ध्याचे पाणी सोडले. प्रत्यक्षात पाणी तीन किमीपर्यंत पोहचल्यावर त्याचे बाष्पीकरण झाले. यामुळे पाणी वाया गेले.