अमरावती -सोमवारी अमरावती जिल्ह्यातील ५३७ ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष हे राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या मोझरी गावातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे लागले होते. या निवडणुकीत मंत्री यशोमती ठाकूर यांच्या ग्रामविकास पॅनलने 13 पैकी 7 जागांवर विजय मिळवून वर्चस्व कायम राखले आहेत. तर कम्युनिस्ट पक्षाच्या जनशक्ती पॅनलने 2 व 4 जागांवर अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली.
मागील निवडणुकीच्या तुलनेत 2 जागा कमी -
मागील ग्रामपंचायत निवडणुकीत यशोमती ठाकूर यांच्या ग्रामविकास पॅनल ने 13 पैकी 9 जागांवर विजय मिळवला होता. परंतु यंदा मात्र या पॅनलला 9 जागांवरून 7 जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे मागील निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या 2 जागा कमी झाल्या आहेत. मागच्या निवडणुकीला यशोमती ठाकूर या आमदार होत्या. यंदा मात्र त्या राज्याच्या मंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री असल्याने व गावातील विकासकामे बघता, या निवडणुकीत त्यांच्या पॅनलचे ९ किंवा त्यापेक्षा जास्त सदस्य निवडणूक येतील, असा कयास येथील बांधण्यात आला होता. परंतु मागच्या निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या दोन जागा घटल्या आहेत.
विजयी झालेले उमेदवार -
ग्रामविकास पॅनलचे सरला ढवळे या वार्ड नंबर 1 मधून विजयी झाल्या आहेत. तर वार्ड नंबर 2 मधून गणेश गायकवाड, मोनिका मते, वार्ड नंबर 3 मधून गजानन तडस, प्रशांत प्रधान, वार्ड नंबर 4 मधून मालती गहूकर, वार्ड नंबर 5 मधून रंजना कांडलकर या विजयी झाल्या आहेत. तर वार्ड नंबर 1 मधून सुरेंद्र भिवगडे तसेच डिंपल सपाटे आणि वार्ड नंबर 4 मधून संजय लांडे व शुभांगी गहूकर हे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. तसेच वार्ड 5 मधून जनशक्ती पॅनलचे मनोज लांजेवार व आरती निमकर यांचा विजय झाला आहे.