अमरावती : सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचे राजकारण दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. त्यावर राज्यभरातून विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांनीही याबातत ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे.
न्यूज अँकर्स सातत्याने महाराष्ट्राची बदनामी करत असतात. काही राजकीय अजेंडा असेल तर तो राबवा, पण इथल्या जनतेच्या अस्मितांशी खेळू नका. जाता-जाता राजकारण हे राजकारण्यांना करू द्या, नाही तर तुम्ही थेट राजकीय प्रवाहात या. असं आडून-आडून खेळण्यात काही मजा नाही! असे ट्विट राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणात काही वृत्तवाहिन्यांकडून महाराष्ट्र सरकार व महाराष्ट्र पोलिसांवर सातत्याने टीका केली जात आहे. अभिनेत्री कंगना रणौत हिने देखील मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर तिच्यावर चहुबाजूनी टीका होत आहे. अशातच शिवसेना आणि कंगना आमने सामने आले आहे. तर, आता रिपब्लिक भारतचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावरून देखील विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात गदारोळ सुरू आहे. असे असतानाच मंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्विट करत कंगना व अर्णब गोस्वामी यांचे नाव न घेता टीका केली आहे.
हेही वाचा -परिचारिकांचा रोष : सात दिवस काळ्या फिती लावून केले काम; मंगळवारपासून काम बंद!