अमरावती- जिल्ह्यासाठी मंजूर असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे सिंधुदुर्गला हलवले, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. यात भाजपसह बीएसपीने देखील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका करत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यामुद्द्यावरून आता अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुद्द्यावर राजकारण होत असून विरोधकांनी मागच्या पाच वर्षात काय केले? याचा हिशोब द्यावा असा घणाघात त्यांनी केला.
सिंधुदुर्गला वैद्यकीय महाविद्यालय हलवण्याच्या आरोपावर बोलताना ठाकूर म्हणाल्या की, सिंधुदुर्गला वैद्यकीय महाविद्यालय हलवले नाही. कोरोनामूळे ही प्रक्रिया रखडली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत महाविद्यालयाबाबत बैठक झाली आहे. त्यामुळे रेंगाळलेल्या गोष्टी लवकरच पूर्ण होतील, असा विश्वास व्यक्त करत यशोमती ठाकूर यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या चर्चेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.