अमरावती- इंस्पायर्ड अवार्ड प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्तीचा विकास होतो. आज इंस्पायर्ड भारत घडवायचा असेल तर विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नव्या अविष्काराबरोबरच चांगली मुल्येही नव्या पिढीत रुजवणे गरेजेचे आहे, असे मत महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले. अमरावतीच्या सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयात शनिवारी ( दि. 9 फेब्रुवारी) यशोमती ठाकूर यांच्या हस्ते राज्यस्तरीय इंस्पायर अवॉर्ड प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षकांना मार्गदर्शन केले.
शालेय शिक्षण विभागातर्फे सिपना अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आयोजित नव्या राज्यस्तरीय इंस्पायर अवार्ड प्रदर्शनाचे उद्घाटन यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून 382 विद्यार्थ्यांनी आपली वैज्ञानिक कलाकृती सादर केली आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांच्या अध्यक्षतेत आयोजित या सोहळ्याला सिपना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल घाडगे, शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप, प्रादेशिक विद्या प्राधिकरणचे संचालक रवींद्र मतकर, शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर, डॉ. रवींद्र आंबेकर, सहसंचालक तेजराव काळे, शिक्षणाधिकारी निलिमा टाके, प्रिया देशमुख, डॉ. संजय खेरडे, शेखर पाटील, राजकुमार अवसरे यांसह आदी उपस्थित होते.
हेही वाचा - शिवसेनेत बच्चू कडू विरुद्ध अब्दुल सत्तार, ...तो अधिकार सत्तारांना नाही