अमरावती - राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंदिरं उघडण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. यावर आक्षेप घेत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्यपालांच्या भूमिकेचा विरोध केला आहे. राज्यपालांसारख्या एका महत्त्वाच्या व्यक्तीने अशी भूमिका मांडणं हे दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले.
राज्यपालांनी काही दिवसांपूर्वी मंदिर उघडण्यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले होते. त्यामध्ये धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. तसेच शिवसेनेच्या हिंदुत्वावर देखील राज्यपालांनी भाष्य केले. यानंतर सर्व स्तरांतून राज्यपालांच्या या भूमिकेवर टीका होऊ लागली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील याचा निषेध केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही नाराजी व्यक्त केली असतानाच आता राज्यमंत्री बच्चू कडूंनी हे वागणं दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे.
ज्या प्रमाणे राज्यपाल बोलत आहेत, ते चुकीचं आहे. अशा प्रकारे एखादा सरपंच जरी बोलला असता, तरी मोठा गोंधळ झाला असता. राज्यपालांसारख्या महत्वाच्या पदावर असणाऱ्या व्यक्तीने अस बोलावं, हे राज्यासाठी दुर्दैवी आहे, असं म्हणत बच्चू कडूंनी याचा निषेध केला आहे.