अमरावती -महाराष्ट्राच्या राजकारणात आक्रमक असलेले बच्चू कडू यांनी अनोख्या आंदोलनाने पूर्वी सत्तेत असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीला घाम फोडला. तर कधी भाजपालाही नाकीनऊ आणले. बच्चू कडू यांच्या नाविन्यपूर्ण आंदोलनाची दखल मुंबई पासून दिल्ली पर्यत दिल्लीपासून ते पंतप्रधान मोदींच्या गुजरात पर्यंत घेतली गेली. सर्वसामान्य नागरिक, दिव्यांग, शेतकरी, शेतमजुरांसह अन्य घटकांसाठी झटणारा सर्वसामान्यांचा हक्काचा नेता म्हणून राज्यात ओळख असलेल्या राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर माफी मागण्याची वेळ आली आहे.
दोन महिन्यांपूर्वी अमरावतीच्या महर्षी पब्लिक स्कूलमध्ये वर्ग दहावीत शिकणाऱ्या आदित्य काळमेघ या हुशार विद्यार्थ्यांने परिस्थिती अभावी शाळेची फी भरली नाही. म्हणून त्याला दहावीत केवळ 52 टक्के गुण टाकून त्याचे शैक्षणिक नुकसान केले आहे. याची गंभीर दखल शिक्षण राज्य मंत्री बच्चू कडू यांनी घेतली होती. तसेच चौकशी करून या शाळेवर कारवाईचे आदेश दिले होते. परंतु दोन महिने उलटूनही शाळेवर शिक्षण विभागाने कुठलीच कारवाई केली नसल्याने आदित्य काळमेघ याने उपोषण सुद्धा केले. दरम्यान ज्या खात्याचे बच्चू कडू शिक्षण राज्यमंत्री आहे त्या खात्यातील अधिकारीही बच्चू कडू यांच्या कठोर भूमिकेला व आदेशाही जुमानत नसल्याची खंत स्वतःहा बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मंत्र्यांचेच जर शिक्षण विभाग ऐकत नसेल तर तिथ सर्वसामान्य जनतेचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
बैठकीत झाला मोठा राडा -
जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. बुधवारी निवासी जिल्हाधिकारी यांच्या कक्षात बैठक सुरू असतानाच भाजप, मनसे व शाळा व्यवस्थापन समितीच्या लोकांमध्ये जोरदार राडा झाला. दरम्यान या विद्यार्थ्याला न्याय देऊन शाळेवर कारवाई करणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी यांनी दिली. दरम्यान आमचे शिक्षण विभागही जुमानत नसल्याची खंत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केली असून त्यांनी माफी मागितली आहे. दरम्यान या शाळेवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पुन्हा शिक्षण विभागाला दिले आहेत.