अमरावती- राज्यमंत्री बच्चू कडू हे शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीकडे जात आहेत. त्या दरम्यान बुधवारी त्यांचा ताफा उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखून धरला होता. त्यानंतर परवानगी मिळवून पलवलकडे निघालेले बच्चु कडू यांच्या वाहनांचा ताफा गुरुवारी राजस्थान व हरियाणा सीमेवर सुनैडा येथे अडविण्यात आला. मात्र कुठल्याही परिस्थितीत नवी दिल्ली गाठण्याचा निर्धार व्यक्त करत बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसह तिथेच ठिय्या आंदोलन केले. शेवटी हरियाणा सरकार नरमले, आणि बच्चू कडू यांच्यासह काही दुचाकींस्वार आंदोलकांना जाण्यास परवानगी देण्यात आली. त्यानंतर कडू हे कार्यकर्त्यांसह पलवल बॉर्डरवर दाखल झाले आहेत.
रस्त्यावरच ठिय्या आंदोलन-
गुरुवारी भरतपूर येथून पलवलकडे हजारो शेतकऱ्यांसह बच्चु कडू निघाले होते. उत्तर प्रदेश पोलिसांनी रस्त्यात अडवून धरले असल्याने राजस्थान-हरियाणा सीमेवरील कामान, पुनान मार्गे त्यांचा ताफा पुढे निघाला होता. मात्र पलवलपासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावर हरियाणा पोलिसांनी बच्चु कडू यांच्या वाहनांचा ताफा रोखून धरला. पोलिसांनी ताफा अडविताच हजारो शेतकरी व बच्चु कडू आणि त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावरच ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. कुठल्या ही फरिस्थितीत बच्चु कडू यांना पलवलमध्ये येण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र पलवल कुठल्याही परिस्थितीत गाठण्याचा निर्धार असल्याने पोलिसांसमोर पेच निर्माण झाला आहे.