अमरावती - राज्यातील कृषी खातं झोपलंय की काय? असा प्रश्न उपस्थित करत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला. नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करायला गेलेल्या राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्यांच्याच सरकारमधील कृषी खात्याला चांगलेच धारेवर धरले.
यावर्षी सुरुवातीला सोयाबीनचे बोगस बियाणे निघाले. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणी संकट आले. त्यातून शेतकरी सावरत नाही तोच आता दुसरे संकट ओढवले आहे. चांदूर बाजार तालुक्यातील अनेक भागात सोयाबीन पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. याची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर मंत्री कडू माध्यमांशी बोलत होते.
सोयाबीनच्या झालेल्या नुकसानीचे सार्वत्रिक पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तत्पूर्वी हा रोग वातावरणामुळे आला की, बियाण्यांमुळे हे तपासणे गरजेचे आहे. पंचनामे झाल्यानंतर ज्यांनी विमा काढला, त्याला विम्याचे पैसे आणि ज्यांनी विमा काढला नाही, त्यांना सरकार मदत देईल, असे आश्वासन कडू यांनी दिले.
हेही वाचा -नांदेड जिल्ह्यात पीककर्ज वाटपाची संथगती; केवळ 25 टक्केच कर्जवाटप
सोयाबीन उत्पादक शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. पेरले तेव्हा निघाले नाही आणि हातात येत होते तेव्हा मारून टाकले. राज्यातील कृषी खाते झोपले आहे की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. बियाणे बाजारात विक्रीला येत, तेव्हा प्रामाणिकरण कसे केले जाते. यात काही घोटाळा होत आहे का? हे पाहणे गरजेचे आहे. महाबीजने बाजारातील 2 ते 3 हजार रुपये क्विंटलचे खराब सोयाबीन घेऊन ते पॅकिंग करून शेतकऱ्यांना 8 हजार रुपये क्विंटलने विकले, असा आरोपही राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाबीजवर केला आहे.