अमरावती - दिवाळी सणाची सुरवात प्रत्येक जण आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने सुरू करत असतात. यानुसार राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या दिवाळीची सुरुवात ही दरवर्षी वृद्धाश्रमातील वृद्धांना आंघोळ घालून त्यांना नवे वस्त्र दान करून सुरू होत असते. यंदाही आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीच्या मधुबन वृद्धाश्रमात वृद्धांना उटणे लावून अंघोळ घातली. त्यानंतर त्यांना नवे कपडे आणि पुरणपोळीचे जेवणही स्वतः वाढून बच्चू कडूंनी या दिवाळीला सुरवात केली आहे.
सातत्याने विविध आंदोलनांच्या माध्यमातून चर्चेत असणारे राज्यमंत्री बच्चू कडू नेहमी सामाजिक कार्यक्रम राबवत असतात. त्याचाच एक भाग म्हणून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गेल्या कित्येक वर्षांपासून ते वृद्धाश्रमात जाऊन आपल्या दिवाळीची सुरुवात करतात.
मागील वर्षीही दिवाळी आश्रमात -
मागील वर्षी दिवाळीच्या काही दिवस पूर्वीस राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले होते. त्यामुळे विजयी झालेले सर्व नेते विजयाच्या आनंद साजरा करत होते. मात्र, बच्चू कडू हे एका अनाथ आश्रमात जाऊन त्यांनी अनाथ मुलांसोबत दिवाळी साजरी केली होती. त्यावेळीही त्यांनी अनाथ मुलांना नवे कपडे, गोडधोड जेवण दिले होते.