अमरावती - जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जीत जडीबुटीचा व्यवसाय करणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथील २३ लोकांच्या कुटुंबाला अखेर दोन्ही जिल्ह्यातील पालकमंत्री आणी प्रशासनाच्या मदतीने घरी रवाना करण्यात आले. तब्बल दोन महिन्यानंतर आपल्या घरी जाण्यास मिळत असल्यामुळे या नागरिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता.
लॉकडाऊन इफेक्ट : दोन पालकमंत्री, एक आमदार यांच्या चर्चेनंतर 'त्यांचा' घरी जाण्याचा प्रश्न मार्गी - अमरावतीतील स्थलांतरित कामगारांचा प्रश्न
अंजनगाव तालुक्यातील कारला या गावी लॉकडाऊनच्या वेळेस वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथील 23 जण अडकून पडले होते, त्यांच्यासह दहा लहान मुलांचाही समावेश होता. या सर्वांना अमरावती आणि वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि आमदार जगताप यांनी चर्चा करून त्यांच्या घरी जाण्यासाठीचा मार्ग मोकळा करुन दिला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २४ मार्चला संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा झाली आणि जे जिथे आहेत तिथेच अडकले. यात सर्वात जास्त त्रास झाला, तो भटक्या जमातीतील लोकांना. अंजनगाव तालुक्यातील कारला गावी लॉकडाऊनच्या वेळेस 23 जण अडकून पडले होते, त्यांच्यासह दहा लहान मुलांचाही समावेश होता. कारला येथील नागरिक आणि तालुक्यातील काही स्वयंसेवी संस्थांनी त्यावेळी त्यांची जेवणाची सोय केली होती. पहिले लॉकडाऊन संपल्यानंतर दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये शासनाने थोडी शिथिलता दिली. नंतर या लोकांनासुध्दा त्यांच्या मुळगावी कारला येथे जाण्यासाठी तहसील प्रशासनाने परवानगी दिली होती. परंतु, वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरुनच त्यांना अंजनगांवला परत पाठवण्यात आले. त्यानंतर त्यांना अंजनसुर्जी येथील बसस्थानकात ठेवण्यात आले. या ठिकाणी साधी पिण्याच्या पाण्याचीदेखील सोय नव्हती. अशा परिस्थितीत रखरखत्या ऊन्हात या लोकांनी दिवस काढले.
दरम्यान तालुक्यातील काही पत्रकारांनी आणि तरुणांनी वर्धा जिल्ह्यातील प्रशासनासोबत संपर्क साधला. तसेच इतर मिडीयावर वृत्तही झळकले. त्यानंतर दोन्ही जिल्ह्यातील पालकमंत्री यशोमती ठाकूर, आमदार विरेंद्र जगताप यांनी वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनिल केदार यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली. यानंतर २३ जणांना कारंजा घाडगे येथे जाण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला. शनिवारी स्थानिक प्रशासन, तालुक्यातील पत्रकार आणि स्वयंसेवी नागरिकांनी त्यांना निरोप दिला. जाताना शहरातील तरुण व्यापारी मो. सिद्दिक यांनी १५ दिवस पुरेल एवढा जीवनावश्यक किराणा तसेच त्यांच्या वाहनात डिझेल भरुन दिले. विशेष म्हणजे याबाबत अमरावतीचे संजय शेंडे यांनी या लोकांची विशेष दखल घेतली होती.