अमरावती - येथे शिक्षण घेणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या 40 विद्यार्थ्यांना घेऊन गुरुवारी राज्य परिवहन महामंडळाच्या दोन बस जम्मूला रवाना झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष यांचे प्रयत्न आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मदत केल्यामुळे लॉकडाऊनमध्ये अमरावतीत अडकलेल्या या विद्यार्थ्यांना आपल्या घरी जाण्याची वाट मोकळी झाली.
अमरावतीत अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन दोन बस निघाल्या जम्मूला; खासदार सुप्रिया सुळे यांनी केली मदत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जम्मू-काश्मीर येथील काही विद्यार्थी हे अमरावतीत अडकून पडले होते. गुरुवारी या विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वगृही सोडण्यासाठी बियाणी चौक येथून राज्य पारिवहन महामंडळाच्या दोन गाड्यांची व्यवस्था करण्यात आली.
अमरावती शहरात श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथील शारीरिक शिक्षण महाविद्यालय, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय या ठिकाणी जम्मू काश्मीर येथील विद्यार्थी शिकायला आहेत. तसेच विदर्भ महाविद्यालयात विविध शाखेच्या अभ्यासक्रमासाठी हे विद्यार्थी आले आहेत. कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी लॉकडाऊन घोषित झाल्यावर हे सगळे विदयार्थी अडचणीत सापडले होते. महाविद्यालय बंद झाल्याने त्यांना घरी जाण्याची ओढ लागली होती. या विद्यार्थ्यांच्या अडचणीबाबत संगीता ठाकरे यांना रवी खंडारे या युवकाच्या माध्यमातून माहिती मिळताच त्यांनी या विद्यार्थ्यांची अडचण सोडवण्यासाठी पुढाकार घेतला.
दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर थेट जम्मूपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या सोडण्यासाठी अडचणी येत असल्याने संगीता ठाकरे यांनी या अडचणींची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांना दिली. तसेच काही नियमांबाबत आलेल्या अडचणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोडविल्याची माहिती संगीता ठाकरे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. गुरुवारी सकाळी 8.30 ला जम्मू-काश्मीर येथील विद्यार्थ्यांसाठी बियाणी चौक येथून राज्य पारिवहन महामंडळाच्या दोन गाड्यांची व्यवस्था करण्यात आली. या विद्यर्थ्यांना चंद्रकांत पोपट यांच्या वतीने जेवणाचे पाकीट देण्यात आले. आपल्याला घरी जायला मिळत असल्याबाबत या विद्यार्थ्यांनी यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि संगीता ठाकरे यांचे आभार व्यक्त केले.