अमरावती- जिल्ह्यात असणाऱ्या विधानसभेच्या आठ मतदारसंघांपैकी बडनेरा मतदारसंघ हा सगळ्यात आगळावेगळा मतदारसंघ आहे. बडनेरा मतदारसंघाचा सुमारे 70 टक्के मतदार हा शहरी भागातील रहिवासी असून तीस टक्के मतदार हा ग्रामीण भागात आहे. एकूण शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही संस्कृती, दोन्ही ठिकाणच्या समस्या, अडचणी आणि दोन्ही भागांचा समान विकास अशा विविध आव्हानांचा सामना करायला लावणारा हा मतदारसंघ आहे. 2009 च्या निवडणुकीत चमत्कारिक विजय मिळवल्यावर अपक्ष आमदार रवी राणा या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. सलग दोनवेळा बडनेरा मतदारसंघातील मतदारांनी रवी राणा यांना मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा या जिल्ह्याच्या खासदार म्हणून त्यांच्यासोबत आहेत. खासदारसोबत असल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास गेल्या दोन निवडणुकांच्या तुलनेत निश्चितच वाढला आहे. अशा परिस्थितीत आमदार राणा यांच्याविरोधात भाजप आणि शिवसेनेतील अनेकांनी कंबर कसली आहे. आमदार राणांविरोधात गेल्या दीड ते दोन वर्षांपासून भाजप आणि शिवसेनेचे इच्छुक उमेदवार दणकावून कामाला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांचा विजय झाला असला तरी बडनेरा मतदारसंघात मात्र नवनीत राणा यांना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यापेक्षा दहा हजाराच्या जवळपास कमी मते मिळाल्याने बडनेरा मतदारसंघात यावेळी आमदार राणा यांची जादू चालणार नाही, अशी अपेक्षा आमदार राणा यांच्या विरोधकांना आहे. यामुळेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत बडनेरा मतदारसंघात आमदार रवी राणा विजयाची हॅट्रिक साधतात की मतदार त्यांच्या विरोधकांना संधी देतात अशी रंगतदार निवडणूक बडनेरा मतदारसंघात यावेळी पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा - आखाडा विधानसभेचा : अकोल्यात पिचडांना कोण देणार टक्कर?
बडनेरा मतदारसंघ शिवसेनेचा गड मानला जायचा. 2004च्या निवडणुकीत पहिल्यांदा सुलभा खोडके यांनी बडनेरा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवला. 2009च्या निवडणुकीत मात्र बडनेरा मतदारसंघाची फेररचना करण्यात आली. नांदगाव खंडेश्वर तालुका धामणगाव रेल्वे मतदारसंघात समाविष्ट करण्यात आला, तर अमरावती शहरातील राधानगर, गाडगेनगर आणि विदर्भ महाविद्यालय परिसर हा बडनेरा मतदारसंघातून अमरावती मतदारसंघात समाविष्ट केला गेला. यासोबतच वलगाव मतदारसंघ संपुष्टात येऊन वलगाव मतदारसंघात येणारा भाग हा बडनेरा आणि तिवसा मतदारसंघात विभागण्यात आला. 2004 ते 2009 पर्यंत आमदार म्हणून सुलभा खोडके यांचा झंझावात बडनेरा मतदारसंघात सतत पाहायला मिळाला. सुलभा खोडके पुन्हा एकदा बडनेरा मतदारसंघातून विजयी होणार अशी अपेक्षा असताना रवी राणा यांची राजकारणात अचानक एंट्री झाली. अवघ्या काही महिन्यात रवी राणा यांनी बडनेरा मतदारसंघ पिंजून काढला. 2009च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून रवी राणा निवडणूक रिंगणात उतरले आणि धक्कादायक विजय त्यांनी मिळवला.
आमदार राणा यांच्या विजयामुळे बडनेरा मतदारसंघाचे चित्र राजकीय दृष्ट्या पालटायला लागले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली. यामुळे रवी राणा यांच्या कट्टर विरोधक सुलभा खोडके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार म्हणून रवी राणा यांच्याविरोधात उभ्या ठाकल्या. 2014 च्या निवडणुकीत पहिल्यांदा भाजप आणि शिवसेनेची युती तुटली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांचा पराभव करून आनंद अडसूळ यांनी मोठा विजय मिळवला होता. त्यावेळी आनंदराव अडसूळ यांना बडनेरा मतदारसंघातून तब्बल 51 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. यामुळेच बडनेरा मतदारसंघात पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकेल या आशेने माजी आमदार दिवंगत संजय बंड यांनी 2009 च्या निवडणुकीत तिवसा मतदारसंघात यशोमती ठाकूर यांच्याविरोधात पराभव पत्कारल्यावर 2014 ची निवडणूक बडनेरा मतदारसंघातून लढण्याचा निर्णय घेतला. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे खोडके आणि राणा समर्थकांमध्ये हाणामारी, जाळपोळ अशा घटना घडल्या तसा प्रकार मात्र 2014 च्या निवडणुकीत कुठेही घडला नाही.
हेही वाचा - गडचिरोली विधानसभा आढावा: भाजप गड राखणार की काँग्रेसला मिळणार गतवैभव?
2014 च्या निवडणुकीत सुलभा खोडके, संजय बंड हे दोन माजी आमदार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचंड लाट असताना भाजपचे तुषार भारतीय यांचे तगडे आव्हान आमदार रवी राणा यांच्यासमोर होते. असे असताना आमदार रवी राणा यांनी बडनेरा मतदारसंघात पुन्हा एकदा बाजी मरली. रवी राणा यांना 46 हजार 827 मते मिळाली होती. रवी राणा यांनी संजय बंड यांचा 7 हजार 419 मतांनी पराभव केला होता. संजय बंड यांना 39 हजार 408 मते मिळाली होती, सुलभा खोडके यांना 33 हजार 897 मते मिळाली तर भाजपच्या तुषार भारतीयांना 12 हजार 663 मते मिळाली होती.
2019 ची विधानसभा निवडणुकाही बडनेरा मतदारसंघात पुन्हा रंगतदार होण्याची चिन्ह आहेत. आता रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा या जिल्ह्याच्या खासदार असल्यामुळे आमदार रवी राणा यांचे वजन पूर्वीपेक्षा निश्चितच अधिक वाढले आहे. असे असले तरी बडनेरा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांच्यापेक्षा आनंद अडसूळ यांना दहा हजाराचे मताधिक्य असल्याने शिवसेनेला बडनेरा मतदारसंघात भगवा फडकेल, अशी आशा आहे. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे कट्टर समर्थक आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुनील खराटे हे गेल्या चार वर्षापासून बडनेरा मतदारसंघात निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. त्यांनी बडनेरा मतदारसंघात शिवसेनेचे चांगल्यापैकी नेटवर्कही तयार केले आहे.