अमरावती - शहरातील फारशी स्टॉप परिसरात मंगळवारी सकाळी दोन एसयूव्ही कारमध्ये आढळलेल्या साडेतीन कोटी रुपयांवर गुजरातमधील अहमदाबाद येथील रहिवासी आणि औषधी व्यापारी कमलेश शाह यांनी दावा केला आहे. एका व्यवहारासंदर्भातले हे पैसे असून तसे कागदपत्रही या व्यापाऱ्याने राजापेठ पोलिसांसमोर सादर केले आहेत.
व्यापाऱ्याकडून न्यायालयात जाण्याचा इशारा -
अहमदाबाद येथील व्यापारी कमलेश शाह यांच्यावतीने त्याचे सीए मयूर शाह आणि वकील शामकुमार मिश्रा यांनी साडेतीन कोटी रुपयांच्या व्यवहारासंबंधीत सर्व पुरावे राजापेठ पोलिसांना सादर केले. ही रक्कम चार दिवसात कमलेश शाह यांना सोपवावी अन्यथा आम्हाला न्यायालयात जावे लागेल असा इशारा कामलेश शाह यांच्यावतीने त्यांच्या वकिलांनी दिला. अशाच एका प्रकरणात केरळ उच्च न्यायालयाच्या निकालाचे उदाहरण देत चार दिवसानंतर या रकमेवर साडेबारा टक्के व्याज आकारले जातील असेही संबंधित व्यापाऱ्याच्या वकील आणि सीएने स्पष्ट केले आहे.
काय आहे नेमका प्रकार -
फारशी स्टॉप परिसरातून हवालाची अवैध रक्कम नेली जात आल्याची माहिती सोमवारी रात्री राजापेठ पोलिसांना मिळाली होती. फारशी स्टॉप परिसरातील वीणा अपार्टमेंट येथून मंगळावारी सकाळी 6 वाजता एम.एच.18 बी.आर 1334 आणि एम.एच.20.डी.व्ही.5774 क्रमांकाच्या दोन स्कॉर्पिओ गाड्या निघाल्या होत्या. दरम्यान फारशी स्टॉप परिसरात राजापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनीष ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक किसन मापारी, शिपाई दुलाराम देवकर, अतुल संभे, दानिश शेख, राहुल ढेंगेकार, अमोल खंडेझोड यांनी सापळा रचून दोन्ही स्कॉर्पिओ गाड्या अडविल्या. या स्कॉर्पिओतील लोकांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी दोन्ही स्कॉर्पिओ गाड्या पोलीस ठाण्यात आणल्या. मॅकेनिकला बोलावून पोलिसांनी दोन्ही स्कॉर्पिओ गाड्यांची सीट उघडून पाहिले असता त्यात मोठ्या प्रमाणात पैसा भरलेला दिसून आला. या प्रकरणात पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले. त्यापैकी स्कॉर्पिओत आलेल्या ज्या चार जणांना ताब्यात घेतले ते चौघेही गुजरात राज्यातील आहे. यामध्ये शिवदत्त गोहिल (30) रा. उना जिल्हा गिरसोमना, वाघेला सिलुजी जोराजी (49) रा. वसई जिल्हा पाटण, रामदेव राठोड(24) रा.सिमर जिल्हा गिरसोमना, नरेंद्र गोहिल (27) रा. राजुला जिल्हा अमरेली अशी चौघांची नावे आहेत. हे चौघेही वाहन चालक आहेत. तसेच या चौघांकडून माहिती मिळाल्यावर फारशी स्टॉप परिसरात वीणा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या निलेश पटेल (27), आणि जिग्नेश गिरीगोसावी (26) यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. हे दोघेही मूळचे गुजरात राज्यातील मैसाणा जिल्ह्यातील रहिवासी आहेत.