माखला गावात आहेत तुटलेल्या किल्ल्याचे अवशेष अमरावती King Kumansingh Melghat : चिखलदरामधील माखला परिसरात एका डोंगरावर कुमानसिंह राजाचा किल्ला होता. लगतच्या बारा गावांवर त्याचं राज्य होतं. या बाराही गावांमध्ये कोणाच्या घरी लग्न झालं तर नवविवाहित दांपत्यास सर्वात आधी राज दरबारात नेऊन राजाच्या किल्ल्यात असणाऱ्या देवांचं दर्शन घ्यावं लागतं, अशी माहिती माखला येथील रहिवासी लाडकीबाई जामुनकर यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.
देवतांची केली जाते पूजा :राजाच्या किल्ल्यातील देवाचं दर्शन घेतल्यावर नवदांपत्यास गावातील बजरंगबलीसह मुठवासह कोरकू समाजातील इतर देवांचं दर्शन घ्यावं लागायचं. हे सर्व देवदर्शन झाल्यानंतर खाणं, पिणं आणि इतर उत्सव साजरे करून नवदांपत्य त्यांच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात करायचे. आजसुद्धा माखला गावासह लगतच्या काही गावांमध्ये लग्न झाल्यावर नवदांपत्यास या ठिकाणी किल्ल्यांमधील सतीमातासह इतर जे काही देव विविध ठिकाणी आहेत, त्यांचं दर्शन घ्यायला आणलं जातं, असं देखील लाडकीबाई जामुनकर म्हणाल्या.
ऐतिहासिक दगडांवर नक्षीदार कोरीव काम : माखला गावालगतच्या डोंगराळ भागात गावातील कोरकू जमातीच्या लोकांच्या काही शेतांमध्ये किल्ल्यातील ऐतिहासिक दगड पडले आहेत. यापैकी काही दगडांची देव म्हणून पूजा केली जाते. या दगडांवर हत्ती किंवा घोडा अशा कुठल्यातरी प्राण्याच्या आकृती कोरलेल्या दिसतात. काही ठिकाणी स्त्री-पुरुषांचे मुखवटे देखील कोरले आहेत. माखला गावालगत असणारा हा किल्ला पाहणारी पिढी आज देखील गावामध्ये आहे.
माघ महिन्याच्या पौर्णिमेला होते पूजा : माखला गावालगत आदिवासी बांधवांच्या शेतांमध्ये किल्ल्यांचे जे काही दगड आहेत, त्यांना धार्मिक महत्त्व देत आदिवासी बांधव नियमित पूजा करतात. यापैकी एका दगडावर फुलासारखे काहीतरी कोरले आहे त्या दगडाची सती माता म्हणून पूजा केली जाते. यासह एका दगडावर युद्धासारखं काहीतरी कोरलं असून, ज्या ठिकाणी तो दगड आहे त्या ठिकाणी कुठल्यातरी देवानं समाधी घेतली असल्याचं या भागातील आदिवासी बांधव मानतात. विवाह सोहळ्यात या सर्व देवांची पूजा केली जाते. माघ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला या देवांच्या पूजेला विशेष महत्त्व असून माघ महिन्याच्या पौर्णिमेला गावातील केवळ पुरुष मंडळीच या देवांची पूजा करण्यासाठी जंगलात येतात, अशी माहिती देखील लाडकीबाई जामुनकर यांनी दिली.
तात्या टोपेंनी या किल्ल्यात घेतला होता आश्रय : 1857 च्या राष्ट्रीय उठावा दरम्यान इंग्रज तात्या टोपे यांचा पाठलाग करीत असताना, तात्या टोपे यांनी मेळघाटात येऊन कुमानसिंह राजाच्या या किल्ल्यात आश्रय घेतल्याची नोंद इतिहासात आहे. तात्या टोपेंच्या मागे आलेल्या इंग्रजी फौजेनं या किल्ल्यावर आक्रमण केलं होतं, त्यावेळी कुमानसिंह राजाचा पराभव झाला असला तरी तात्या टोपे मात्र या ठिकाणावरून पळून जाण्यास यशस्वी ठरले होते.
किल्ल्याची साक्ष देणारी भिंत कोरोना काळात पाडली :माखला हे मेळघाटातील अतिदुर्गम गाव असून, या गावात असणारा एकमेव पाण्याचा तलाव हा व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीत आहे. कोरोना काळात नाम फाउंडेशनच्या वतीनं या तलावाच्या खोलीकरणासाठी एक जेसीबी पाठवण्यात आला होता. व्याघ्र प्रकल्प प्रशासनानं मात्र तलावाच्या खोलीकरणाचे काम करण्यास ना मंजुरी दिली. यानंतर तलाव खोली करण्यासाठी आलेले जेसीबी काही दिवस गावातच उभे होते. दरम्यान कुमानसिंह राजाच्या किल्ल्याची साक्ष देणारी भली मोठी भिंत ज्या व्यक्तीच्या शेतात होती, त्या व्यक्तीनं गावात आलेल्या जेसीबीच्या मदतीनं ती भिंत जमीनदोस्त केली आणि या भागात ऐतिहासिक साक्ष देणारा अखेरचा पुरावा नष्ट झाल्याची माहिती माखला ग्रामस्थांनी 'ईटीव्ही भारत" शी बोलताना दिली.
हेही वाचा :
- काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचा दुसरा दिवस; आज नागालँडमध्ये करणार मुक्काम
- आई- वडिलांसह भावाची हत्या करून मुलानं अपघाताचा केला बनाव, 'असे' फुटलं बिंग
- 'पैसे देऊन बलात्कार सुरू, राज्यातील उत्तम गोष्टी हिसकावण्याचा प्रयत्न'; जमीन परिषदेत राज ठाकरे संतप्त