अमरावती - जिल्ह्यातील मेळघाट या व्याघ्र प्रकल्पाला कॅट्स अर्थात कंजर्वेशन ॲश्युअर्ड टायगर स्टॅंडर्ड या जागतिक मानांकनाचा दर्जा प्राप्त झाला आहे. वाघाच्या संवर्धनासाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने आजवर केलेले सर्व महत्त्वपूर्ण प्रयत्नांची दखल घेत हे मानांकन प्राप्त झाले आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सुवर्ण महोत्सवी काळात अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
हे आहे मेळघाटचे वैशिष्ट्य : मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये वसलेला देशातील पहिल्या नऊ व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे. उंच समांतर पर्वत रांगा, उंच सागवान वृक्ष, मिश्र वनपट्टे, धबधबे यांनी समृद्ध असलेल्या मेळघाटात गौर, सांबर या प्राण्यांपासून पक्षी, फुलपाखरे, कीटकांपर्यंत भरपूर जैवविविधता आहे. राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे यांनी ईटीव्ही भारताला सांगितले की, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर हा सन्मान मिळाल्याने प्रकल्पातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आनंदात भर पडली आहे.
सात विषयांचा तपास अहवाल : व्याघ्र प्रकल्पाचे सामाजिक, सांस्कृतिक, जैविक महत्त्व, व्यवस्थापन नियोजन, स्थानिक समुदाय, पर्यटन, संरक्षण, अधिवास विकास, वाघांची संख्या अशा सात विषयांवर केलेल्या कामाचा सविस्तर अहवाल सादर करण्यात आला.
टायगर फोरमकडे प्रकल्प :मंचाच्या पथकाने व्याघ्र प्रकल्पातील विविध ठिकाणी भेट देऊन या कामांची पाहणी केली. या टीममध्ये सेवानिवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक दर्जाचे अधिकारी सहभागी होतात. टीमने प्रत्यक्ष काम, व्यवस्थापनाचा दर्जा, संरक्षणाची गुणवत्ता याची पाहणी करून ग्लोबल फोरमला अहवाल सादर केला. त्यानुसार मंचाने ग्लोबल स्टँडर्ड प्रकल्प जाहीर केला आहे.