अमरावती - शहरातील मासानगंज परिसरात औषधाच्या दुकानात मस्ती करणाऱ्यांना हटकून औषध दुकान बंद करायला लावणाऱ्या पोलीस शिपायास परिसरातील जमावाने घेरले आणि शिवीगाळ केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच पोलीस शिपायाने जमावाला हात जोडले आणि बंद केलेले दुकान उघडले.
..अन जमावाच्या भीतीने पोलीस शिपायाने उघडले बंद केलेले औषध दुकान - जमावाच्या भीतीने पोलीस शिपायाने उघडले बंद केलेले औषध दुकान
औषधाच्या दुकानात बसून टवाळक्या करणारे निदर्शनास पडताच कर्तव्यावर असलेल्या पोलिसाने त्यांना हटकले. बाचाबाचीनंतर पोलिसाने दुकान बंद करण्यास भाग पाडले. मात्र काही वेळातच परिसरातील जमाव एकत्र आला आणि दुकान पुन्हा उघडण्यास भाग पाडले.
![..अन जमावाच्या भीतीने पोलीस शिपायाने उघडले बंद केलेले औषध दुकान Medical shop reopen by peoples in Amaravati](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6835175-692-6835175-1587141868080.jpg)
कोरोनामुळे संचारबंदी असल्याने अत्यावश्यक सेवा म्हणून औषधाची दुकाने सुरू आहेत. मासांगनज परिसरात गस्तीवर असणाऱ्या पोलीस शिपायाला एकता मेडिकल असे नाव असणाऱ्या औषध दुकानात चार-पाच युवक टवाळक्या करीत असल्याचे दिसले. औषध दुकानात गर्दी कशाची अशी चौकशी करून पोलीस शिपायाने दुकान बंद करायला लावले.
दरम्यान, काही वेळातच परिसरातील जमाव दुकानसमोर जमला आणि जमावतील अनेकांनी एकट्या असणाऱ्या पोलीस शिपायास शिवीगाळ करून औषध दुकान जसे बंद केले तसे उघडून देण्यास सांगितले. जमावाचा रोष पाहता पोलीस शिपायाने सर्वाना हात जोडून शांत राहण्यास सांगितले आणि बंद केलेले औषधाचे दुकान स्वतः उघडून दिले. दरम्यान, पोलीस शिपायाला मारहाण झाल्याची अफवा उडताच शहर कोतवालीसह नागपुरी गेट पोलीस ठाण्याचे पोलीस तसेच पोलीस मुख्यलयातील पोलिसांचा ताफा मासानगंज परिसरात दाखल झाला. परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला.