अमरावती : एकीकडे शहरात कोरोनाने थैमान घातले आहे. तर, दुसरीकडे या परिस्थितीत अमरावती महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने राजीनामा दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. तर त्यांचा राजीनामा देण्यामागचे कारण मात्र अस्पष्ट आहे.
अमरावती महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा राजीनामा, चर्चेला उधाण - amravati municipal corporation news
कोरोनाच्या संकटकाळात अमरावती महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल काळे यांच्यावर महत्वाची जबाबदारी होती. असे असताना त्यांनी 15 दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. यामुळे, अनेक चर्चांना उधाण आले आहे.
डॉ. विशाल काळे असे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नाव आहे. ते अमरावती महापालिकेत रुजू होण्यापूर्वी गोंदिया जिल्हा परिषदेत वैद्यकीय अधिकारी होते. 2018 मध्ये संजय निपाणे आयुक्त असताना डॉ. काळे अमरावती महापालिकेत वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाले होते. दरम्यान त्यांच्या नियुक्तीवर एका व्यक्तीने आक्षेप घेतल्यावर प्रकरण न्यायालयात गेले. यात उच्च न्यायालयाने डॉ. काळे यांच्या बाजूने निकाल दिला होता. आता कोरोनाच्या संकटकाळात वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. काळे यांच्यावर महत्वाची जबाबदारी होती. असे असताना त्यांनी 15 दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे.
डॉ. काळे यांनी दिलेल्या राजीनाम्याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले असून त्यांनी स्वतःच्या मर्जीने राजीनामा दिला असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, त्यांच्या राजिनामा देण्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. राजीनामा देणाऱ्या व्यक्तीला आपण अडवू नये, असे माझे धोरण असल्याचे आयुक्त प्रशांत रोडे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले. येत्या काही दिवसात सर्व औपचरिकता पूर्ण होताच डॉ. विशाल काळे यांचा राजीनामा मंजूर केला जाणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.