महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Village Famous For Wheat Production: सातपुडा पर्वत रांगेतील 'हे' गाव आहे गव्हाचे कोठार; गव्हाच्या उत्पादनामुळे गावाची झाली भरभराट

सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या मेळघाटात चिखलदऱ्याप्रमाणेच पहाडावर उंच ठिकाणी वसलेले मसोंडी हे गाव गव्हासाठी प्रसिद्ध आहे. मसोंडी येथील गहू अतिशय दर्जेदार आणि पोषक असून गव्हाच्या उत्पादनामुळेच मसोंडी हे छोटेसे गाव समृद्ध झाले आहे. ईटीव्ही भारतच्या या विशेष रिपोर्टमधून याबद्दल अधिक जाणून घेवू या.

Masondi village Amravati
गहू उत्पादनासाठी प्रसिद्ध गाव

By

Published : May 4, 2023, 1:24 PM IST

'मसोंडी' गहू उत्पादनासाठी प्रसिद्ध गाव

अमरावती :मसोंडी हे चिखलदरा तालुक्यात येणारे मेळघाटातील एकमेव असे गाव आहे, जिथे मोठ्या प्रमाणात गव्हाचे उत्पादन गावातील गवळी बांधव आपल्या शेतात घेतात. गव्हाला मुबलक पाण्याची गरज असताना मसोंडी गावात ज्या गव्हाची लागवड केली जाते, तो गहू लागवडीनंतर लवकरच शेतकऱ्यांच्या हातात येतो. या ठिकाणी कुठल्याही प्रकारे रासायनिक खतांचा वापर केला जात नाही. केवळ शेणखताच्या भरवशावर गव्हाचे उत्पन्न घेतले जाते. हा लोकमान गहू असून तो सरबती गव्हाची बरोबरी करतो.


गव्हाच्या भरवशावर गाव :550 लोकसंख्या असणाऱ्या मसोंडी या गावात एकूण 200 घर आहेत यापैकी आदिवासी बांधवांचे पंधरा-वीस घर असून इतर सर्व घरही गवळी बांधवांची आहेत. गावात दुधाचा व्यवसाय असला तरी गावाचे अर्थकारण पूर्णतः गव्हाच्या भरोशावर आहे. गहू हा गावातच विकल्या जातो. हा गहू अतिशय दर्जेदार आहे. त्यामुळे परतवाडा अमरावती तसेच लगतच्या मध्य प्रदेशातील गावांमधून अनेकजण मसोंडी या गावात येऊन गहू थेट शेतकऱ्याकडून विकत घेतात.

गहू गावातच विकला जातो :ग्रामस्थ त्यांच्या कुटुंबाला वर्षभर लागतो, तितका गहू घरात ठेवून इतर सर्व गहू गावात येणाऱ्या व्यक्तींना विकतात. जर गावात गहू विकला गेला नाही, तर येथील गहू अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत विकण्यासाठी आणला जातो. मात्र अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गहू विकासाठी नेण्याची वेळ फार कमी आमच्यावर येते. आमचा गहू प्रसिद्ध असल्यामुळे तो गावातच विकला जातो, अशी माहिती मसोंडी येथील ग्रामस्थांनी ईटीव्ही भारतची बोलताना दिली.

पाण्याअभावी शेतकरी संकटात :सातपुडा पर्वत रांगेत चिखलदरा तालुक्यात मसोंडी हे गाव समुद्रसपाटीपासून एकूण 1180 मीटर उंचावर वसले आहे. या गावात एकूण पाच छोटे तलाव आहेत. तसेच चार अप्रतिम धबधबे येथील पहाडावरून खाली कोसळतात. पावसाळ्यात मुसळधार पाऊस कोसळला की, या गावाचा जगाशी संपर्क तुटतो अशी अवस्था आहे. तरी चार ते पाच वर्षांपासून गावात पाणीसाठाच उरत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना आपल्या शेतात येणारे एकमेव गव्हाचे पीक घेणे कठीण झाले आहे. गावालगत असणाऱ्या सर्वात मोठ्या तलावाचा गाळ काढण्यासाठी 22 लाख रुपये मंजूर झाले आहे. तरीही या तलावातील गाळ काढल्या जात नसल्याची खंत ग्रामस्थांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली. गावातील तलावांचे खोलीकरण करून मुबलक पाणी साठवण्याची व्यवस्था झाली, तर आज 800 ते हजार क्विंटल होणारे गव्हाचे उत्पन्न दुपटीवर पोहोचेल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

'असे' घेतले जाते गव्हाचे उत्पन्न :ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या चार महिन्यात गावात गव्हाचे उत्पन्न घेतले जाते. हा संपूर्ण जंगलाचा परिसर असल्यामुळे वन्य प्राण्यांचा वावर या परिसरात असतो. त्यामुळे शेतातील गव्हाच्या संरक्षणासाठी घरातील सर्व सदस्य संपूर्ण चार महिने आपल्या शेतातच राहतात. गव्हाची अतिशय मेहनतीने काळजी घ्यावी लागते. आम्ही सर्व मोठ्या मेहनतीने आमच्या गावात येणारे एकमेव गव्हाच्या पिकासाठी प्रचंड मेहनत घेतो, मात्र शासनाकडून आमच्या अडचणी समस्यांची कुठलीही दखल घेतली जात नाही, अशी खंत देखील ग्रामस्थ व्यक्त करतात. आम्हाला केवळ आमच्या गावातील सर्व तलावांमधील गाळ बाहेर काढून हवा. गावाला जोडणारा नदीवरचा पूल उंच करून हवा. सरकारने आमचे हे काम करून दिले, तर आमचा उत्कृष्ट गहू आणखी दुप्पट तिप्पट प्रमाणात आम्ही घेऊ शकतो, असे मसोंडी येथील रहिवासी म्हणतात.

हेही वाचा : Black Wheat Production : काळ्या गव्हाचे उत्पादन; उत्पन्नाचा ठरतोय नवा स्त्रोत

ABOUT THE AUTHOR

...view details