अमरावती -सातपुडा पर्वत रांगेत अमरावती जिल्ह्यात घनदाट जंगल असणारे मेळघाट जंगल आहे. मेळघाट म्हटले की, आदिवासी संस्कृती, पर्यटन केंद्र, अस्वल आणि वाघांचा वास असे सारे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. मात्र, असे असताना आता मेळघाटच्या अखेरच्या भागात सातपुडा पर्वताच्या सर्वात उंच टोकावर वसलेल्या गोलाई गावात मात्र चक्क मराठवाड्यातील एखाद्या गावात आल्याचा भास होतो.
पोटापाण्याच्या प्रश्नासाठी 60 वर्षांपूर्वी मराठवाड्यातून आलेल्या मजुरांनी वन विभागाच्या मदतीसाठी वसवलेल्या गोलाई गावात आपली भाषा, संस्कृती कायम टिकवली आणि जपली आहे. 1950-51 या काळात मराठवाड्यात दुष्काळ असताना अकोला ते खंडवा या रेल्वे मार्गाचे काम भारतीय रेल्वेने हाती घेतले. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता परभणीसह लागतच्या भागातील अनेक मजूर रेल्वे मार्गाच्या कामासाठी विदर्भात आले. अकोला, अकोट येथून थेट मेळघाटातील दऱ्या-खोऱ्यातून जाणाऱ्या रेल्वे मार्गाचे काम 1960 मध्ये पूर्णत्वास आले. धुळघाट रेल्वे या भागात तुकाराम मुंडे, देवराव मुंडे, शंकर मुंडे, गुणाजी कातखडे, बापजी मुंडे आणि शेख चांद हे परभणी जिल्ह्यात येणाऱ्या गंगाखेड तालुक्यातील बडबनी या गावातील पाच मजुरांना वन विभागासोबत काम करा, अशी ऑफरच त्यावेळी तहसीलदारांनी दिली.
धुळघाटलगत वनहक्क आणि वनग्राम योजनेंतर्गत त्यांना घरातील एक सदस्य वन विभागाच्या कामासाठी द्या आणि त्या मोबदल्यात 16 एकर शेती घ्या, असे सांगण्यात आले. धुळघाट लागत महिमकुंड परिसरात या पाच जणांना गाव वसविण्याची परवानगी मिळाली. त्यावेळी सोबत चार कोरकू आदिवासी मजुरही सोबत होते. यानंतर महिमकुंड येथे मोठ्या दगडाला शेंदूर लावून हनुमानची मूर्ती स्थापन करण्यात आली आणि त्यानंतर मराठवाड्यात असणाऱ्या आपल्या कुटुंबाला घ्यायला आमचे वडील आणि इतर चौघे 375 किमी अंतरावर परभणी जिल्ह्यातील आपल्या गावी आले, अशी माहिती भगवान तुकाराम मुंडे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.
यापुढचा किस्सा तर सिनेमाच्या कथानकासारखाच आहे. आपल्या गावातील लोकांची, नातेवाईकांची भेट घेऊन तुकाराम मुंडे, देवराव मुंडे, गुणाजी मुंडे, बापजी मुंडे मेळघाटकडे निघाले. तो प्रवास 18 दिवसांचा होता. आता तहसिलदारांनी ज्या महिमकुंड परिसरात जागा दिली होती त्या जागेवर आता कोरकू कुटुंबांना अधिकार मिळाला होता. 'वो लोग तो भाग गया' असे कोरकू लोकांनी त्या परिसरात आलेल्या तहसिलदारांना सांगितले होते. अशा परिस्थितीत आमचे वडील आणि सर्व धरणीला गेले. आम्ही आमच्या कुटुंबाला आणायला गेलो आणि इकडे आम्हाला मिळालेली जागा गेली. त्यावेळी तहसिलदारांनी वन वाचविण्याच्या उद्देशाने आमच्या लोकांना या भागात जागा दिली. उंचावर असणारा हा परिसर म्हणजे आमचे गोलाई गाव असे भगवान मुंडे सांगतात.
सध्या गोलाई गावात मराठवाड्यातील एकूण 1 हजार 500 कुटुंब राहत आहेत. त्यांची लोकसंख्या जवळपास 2 हजार 100 इतकी आहे. तसेच लागतच्या राणीगाव येथेही मराठवाड्यातून आलेले काही लोक आहेतच. वन विभागाने त्या काळी जंगलाला आग लागणे, वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी मदत लागताच बोलविणे, अशी कामे या लोकांकडून करून घेतली. प्रत्येक कुटुंबाला 16 एकर जमीन मिळाल्याने शेती आणि गाई-म्हशींचे पोषण हा मुख्य व्यवसाय येथे सुरू झाला. दिवसाला 4 क्विंटल खवा या गावात तयार केला जायचा. यानंतर अकोट, अकोला, धारणीसह मध्यप्रदेशातील अनेक गावांत गोलाई येथून हा खवा विक्रीसाठी जायचा.