अमरावती -तस्करी करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लाखो रुपये किंमतीला विकल्या जाणाऱ्या दुर्मीळ अशा मांडूळ सापाला अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील सर्पमित्रांनी जीवदान दिले आहे.
गुप्तधन शोधण्यासाठी होते तस्करी
तिवसा तालुक्यातील अनकवाडी येथील सागर साबळे यांच्या शेतामध्ये आज सकाळच्या सुमारास दुर्मीळ असा मांडूळ जातीचा साडेतीन फूट लांबीचा साप आढळून आला होता. त्यानंतर सर्पमित्र शुभम विघे, निसार शेख आणि सागर महल्ले या तीन सर्पमित्रांनी या सापाला सुखरुप रेस्क्यू केले. त्यानंतर त्याची नोंद वनविभागात करून नंतर या सापाला सुरक्षित ठिकाणी जंगलात सोडले. हा साप पूर्णपणे बिनविषारी असून या सापाचा वापर गुप्तधन शोधण्यासाठी केला जातो. त्यामुळे याची मोठ्या प्रमाणात तस्करीदेखील होत असते.
मांडुळाची तस्करी कशासाठी केली जाते?
मांडूळ सापाबद्दल बऱ्याच अंधश्रद्धा आहे. मांडूळ सापाद्वारे काळी जादू, अघोरी विद्या, पैशांचा पाऊस, गुप्तधन शोधणे या आणि अशाच बऱ्या अंधश्रद्धा या मांडूळ सापाबद्दल आहेत. त्यामुळे त्याची तस्करी केली जाते. सरकार आणि प्रशासनाने मांडूळ सापाच्या तस्करीवर बंदी आणली आहे. या मांडूळ सापाची किंमत लाखोंच्या घरात आहे.
अनेकांना खावी लागली जेलची हवा
मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करण्यावर पूर्णतः बंदी आहे. अशी तस्करी करून त्याचा वापर दुसऱ्या कामासाठी केल्यास तो कायद्याने गुन्हा ठरतो. तरीसुद्धा अनेक जण तस्करी करतात. अशाप्रकारे महाराष्ट्रातही अनेक तस्करांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.
कसा असतो मांडूळ?
सापांच्या सर्व प्रजातीमध्ये मांडूळ लाजाळू व शांत स्वभावाचा आहे. मंद हालचाल, जाडसर शरीर, शेपटी व तोंडात जवळपास साम्य वाटत असल्याने या सापाला दुतोंड्या असे नाव आहे. लालसर किंवा तपकिरी रंग, पोटाचा रंग फिकट तपकिरी तोंड व शेपटी आखूड, डोळे लहान असे या सापाचे वर्णन आहे.