अमरावती : लग्नाचे आमिष दाखवून एका तरूणीचे अनेकवेळा लैंगिक शोषण करण्यात आले. आरोपीचे खरे रूप कळताच तिने त्यास नकार दिला. त्यामुळे त्याने तिचे खासगी फोटो समाज माध्यमांवर प्रसारित केले. या प्रकरणाची वाच्यता केल्यास पीडितेचे ३५ तुकडे करण्याची धमकी त्याने चक्क फेसबुकवरुन दिली. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी आरोपी मयूर रामधन गाडेराव (रा. अहमदाबाद, गुजरात) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.
असे आहे प्रकरण :तक्रारकर्ती तरूणी मोर्शी येथील रहिवासी आहे. तक्रारीनुसार, आरोपी मयूर व विवाहित २८ वर्षीय या पीडित महिलेची २०१८ पासून ओळख होती. पीडितेचे पतीसोबत कौटुंबिक छळाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले. त्याने नोव्हेंबर २०१९ मध्ये तिचे अमरावती येथील एका गेस्ट हाऊसमध्ये अनेकवेळा लैंगिक शोषण केले. २०२० पर्यंत त्यांच्यात संवाद होता. मात्र, पुढे त्याने लग्न करण्यास नकार दिला. दरम्यान १२ ऑगस्ट २०२२ रोजी मयुरने फेसबुकवर रियान शर्मा नावाने बनावट अकाउंट तयार करून पीडितेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. त्यानंतर तो खोटे नाव सांगून तिच्याशी बोलत राहिला. मात्र तो आपला जुना प्रियकर मयुरच आहे, असे तिच्या लक्षात आले. त्यामुळे तू खोटे अकाउंट बनविले, असे तिने त्याला बजावले. त्यावर माझ्याकडून चुक झाली, मला माफ कर, पुन्हा असे होणार नाही. मी तुझ्या सोबत लग्न करतो, असे फेसबुकवर मॅसेज तिला पाठवले. परंतु त्याच्यावरील विश्वास उडाल्याने तिने लग्न करण्यास नकार दिला.