अमरावती -जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात कांडली गावालगत एका शेतशिवारात महिला आणि पुरुषाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ( Man & Woman Dead Body Found ) सुधीर रामदास बोबडे (48) आणि अलका मनोज दोडके(48) अशी मृतांची नावं असून ते कांडली गावातील रहिवासी आल्याचे स्पष्ट झाले आहे.
दोन दिवसांपासून होते बेपत्ता -
मृत रामदास बोबडे हा विवाहित असून तो पानटपरी चालवतो. तर विवाहीत महिला अलका मनोज दोडके ही मृत महिला सुद्धा विवाहित आहे. हे दोघेही कालपासून बेपत्ता होते. या दोघांचाही शोधाशोध सुरु होता. आज सकाळी या दोघांचाही मृतदेह रक्ताच्या थारोळयात कांडली जवळ येणी पांढरी शेतशिवारात दिसुन आला.
आत्महत्त्या केल्याचा संशय -
घटनास्थळी दोघांचे मोबाईल, पर्स व इतर साहित्य पोलिसांनी पंचनामादरम्यान ताब्यात घेतले. प्रथम दर्शनी या दोघांनी आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. महिलेच्या पोटात व गळयावर चाकूने वार केले असून तर सुधिरच्या गळ्यावरही वार केल्याचे आढळून आले आहे. दोघांचेही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी गोहर हसन, परतवाडा ठाणेदार संतोष ताले घटनास्थळी पोहोचले. या घटनेचा पुढील तपास केल्या जात आहे.