अमरावती:ऐन उन्हाळ्यात अमरावती जिल्ह्यात सोसाट्याचा वारा आणि बरसलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. संत्रा, गहू, हरभरा पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी जिल्ह्यातील शेतात जाऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. जिल्ह्याचा दौरा करून राणांनी तालुकातील गावा-गावात जाऊन शेतीची पाहणी केली. थेट शेतात जाऊन त्यांनी बांधावरील शेतकऱ्यांशी संवाद साधला. वादळी वारा आल्याने घरांची पडझड झाली. कित्येक घरांचे टीन पत्रे उडून गेले. अनेक ठिकाणी गुरे -ढोर दगावले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या भावना राणांजवळ व्यक्त केल्या.
शेतकऱ्यांशी साधला संवाद : रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दर्यापूर, अंजनगाव, अचलपूर, चांदूरबाजार, तिवसा, भातकुली व अमरावती तालुकातील भागाची अधिकाऱ्यांसोबत पाहणी करताना नवनीत राणा यांना गहिवरून आले. निसर्गाने साथ सोडली असली तरी आमचे सरकार मात्र शेतकऱ्यांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभे आहे. आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही खासदार नवनीत राणा यांनी आज (शनिवारी) शेतकऱ्यांना दिली. राणा यांनी जिल्हातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.