अमरावती :आज महाराष्ट्रासह देशभरात शिवभक्त महाशिवरात्री साजरी करत आहेत. शिवलिंग ला पंचामृताचा अभिषेक करत आहेत. सर्वत्र महादेवाचा जप करताना भाविक दिसत आहे. अशीच एक अख्यायीका अमरावतीमध्ये रहायला मिळत आहे. महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी या भव्य शिवलिंगाच्या परिसरात तपश्चर्या करीत असताना त्यांना एक दिवस साक्षात्कार झाला. महादेवाने शिवलिंगापासून पूर्व दिशेला पाच किलोमीटर अंतरावर चालत गेल्यावर त्या ठिकाणी तपश्चर्या करण्याबाबत श्री चक्रधर स्वामींना सांगितले असल्याचे भाविक सांगतात. विशेष म्हणजे या शिवलिंगपासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या अष्टमासिद्धी या महानुभाव पंथीयांच्या धार्मिक स्थळावर एक छोटीशी विहीर आहे. या विहिरीच्या पाण्याला कापुराचा वास येत असल्यामुळे या विहिरीला कापूर विहीर देखील म्हणतात. श्री चक्रधर स्वामी या परिसरात आल्यास त्यांना जमिनीतून झिरपणाऱ्या पाण्याचा कापुराप्रमाणे गंध आला. त्या ठिकाणी विहीर खोदली असता त्या विहिरीच्या पाण्याला कापुराचा गंध आला तो आज देखील कायम आहे.
श्री चक्रधर स्वामींना झाला होता साक्षात्कार : दर मंगळवारी आणि शुक्रवारी या विहिरीच्या पाण्याने लहान बाळांची आंघोळ घातल्यामुळे त्यांना कुठलेही आजार होत नाही अशी मान्यता आहे. आज महानुभाव पंथीयांचे प्रमुख तीर्थस्थळ म्हणून अष्टमासिद्धी संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असून अचलपूर येथील शिवलिंगामुळे झालेल्या साक्षात्कारामुळेच अष्टमासिद्धी हे तीर्थस्थळ स्थापन झाल्याची मान्यता आहे. स्वतः श्री चक्रधर स्वामी यांनी अचलपूर येथील या शिवलिंगावर पानाचा विडा अर्पण केल्याचे सांगितले जाते. यामुळेच केवळ श्रीकृष्णाची भक्ती करणारे महानुभाव पंथीय अचलपूर येथील या शिवलिंगाची देखील मोठ्या श्रद्धेने पूजा करतात शिवलिंगाला विडा अर्पण करतात. अशी माहिती या मंदिराचे विश्वस्त रूपचंद चंदेले यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.