अमरावती - भारत सरकारने वंदे भारत अभियानांतर्गत परदेशातील नागरिकांना भारतात परत आणण्यासाठी विमानसेवा सुरू केली असताना दुबईतील मराठी माणूस मात्र विमानाची वाट आतुरतेने पाहत आहे.
आपल्या व्यथा मांडताना दुबईत अडकेल्या धनश्री पाटील दुबईत मोठ्या संख्येने भारतीय नागरिक कामानिमित्त राहत आहेत. दुबई सरकार भारतीयांना मायदेशी पाठविण्यासाठी सज्ज आहे. भारत सरकारने दोन आठवड्यात दुबईतून अनेकांना भारतात आणले आहे. महाराष्ट्रातील नागरिकांसाठी मात्र अद्यापही विमानसेवा सुरू झालेली नाही. कोरोनामुळे दुबईतील अनेक मराठी माणसांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. आता आपण घरी कधी जाणार याची वाट दुबईतील मराठी माणूस पाहतो आहे. दोन आठवड्यापासून दुबईतून भारतात विमानांची उड्डाणे सुरू आहेत. मात्र, दुबईहून महाराष्ट्रासाठी एकही विमान निघालेले नाही आणि कधी निघणार याची माहिती नसल्याने मराठी माणूस खचला आहे. दुबईत असणाऱ्या धनश्री पाटील यांनी महाराष्ट्र सरकारने दुबईत अडचणीत असणाऱ्या महाराष्ट्रातील लोकांना त्वरित मायदेशी नेण्याची विनंती धनश्री पाटील यांनी केली आहे.