अमरावती - खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यांचा निकटवर्तीय तसेच युवा स्वाभिमान पार्टीचा असलेला मेळघाट प्रमूख उपेन बच्छले याने आपल्या मुलीला आणि पत्नीला वाऱ्यावर सोडले आहे. याबाबत या पिडीतेने नवनीत राणा यांच्याकडे मदत मागत न्याय देण्याची मागणी केली. मात्र, मदत करण्याऐवजी मला विचारुन तू त्याच्याशी लफडा केला का, असा उलट सवाल नवनीत राणा यांनी या महिलेला केला आहे. याची गंभीर दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. नवनीत राणा यांनी याप्रकरणी योग्य तो खुलासा लेखी स्वरूपात द्यावा, असे निर्देश महिला आयोगाने दिले ( Women Commission Notice Navneet Rana ) आहेत.
ऑडिओ क्लिप व्हायरल
युवा स्वाभिमान पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता उपेन बच्छले याने आपली फसवणूक केल्याची तक्रार पिडीत महिलेने फोनद्वारे नवनीत राणा यांच्याकडे केली. तेव्हा नवनीत राणा यांनी पिडीतेची मदत करायची सोडून उद्धटभाषेत उत्तर दिले. मला विचारुन लफडा केला का, असा सवाल त्यांनी महिलेला विचारला. हीच दीड मिनिटांची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल ( Navneet Rana Audio Clip ) झाली आहे.